नागपूर : भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद संदर्भात शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर आता फडणवीस यांनीही पलटवार केला आहे. सीएए कायद्यासंदर्भात शरद पवार जाणीवपूर्वक खोटे बोलून संभ्रम पसरवत असल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. ते नागपुरात सीएए कायद्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या एका व्याख्यानात बोलत होते.
शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना कायदे पूर्ण माहित असतानाही ते जाणूनबुजून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचे फडणवीस म्हणाले. गुरुवारी शरद पवार यांचे भाषण ऐकलं. पवारांना सीएए कायद्याबद्दल माहिती आहे, सध्या एसआरसीची अंमलबजावणी केली जात नाही, याची माहिती त्यांना आहे. मात्र, तरी शरद पवारांनी बंजारा समाज आणि इतर भटक्या जमातींना उद्या देशाबाहेर काढले जाईल असा संभ्रम जाणूनबुजून निर्माण केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

पवार जाणीवपूर्वक संभ्रम करतायेत : फडणवीस
जर ज्येष्ठ नेते समाजात भीती पसरवत असतील तर काय स्थिती होईल असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला. फक्त मतांच्या राजकारणासाठी लोकांमध्ये जाणीवपूर्वक असे संभ्रम निर्माण करुन देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न आज अनेकजण करत आहे. अनेक लोक यात आपले हात धुवून घेत असल्याचेही ते म्हणाले. त्यांना हे आंदोलन सत्तेत जाण्याची संधी वाटत असल्याचा आरोपही फडणवीसांनी केला. दरम्यान, धरमपेठ शिक्षण संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या या व्याख्यानाला काँग्रेस पक्षाने विरोध दर्शविला होता. शैक्षणिक परिसरात असे राजकीय मुद्यांवरील कार्यक्रम नको अशी काँग्रेसची मागणी होती. संध्याकाळी देवेंद्र फडणवीस व्याख्यान देत असताना युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना शांततेत बाहेर काढले. मात्र, बाहेर निघाल्यानंतर रस्त्यावर उभे राहून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत कार्यक्रमाला विरोध दर्शविला. यावेळी पोलिसांनी आठ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.


काय म्हणाले होते पवार?
एल्गार परिषद प्रकरणात राज्य सरकारच्या एसआयटीने तपास केला असता तर पूर्वीचं सरकार आणि अधिकाऱ्यांचा पितळ उघडं पडलं असतं, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं होतं. यासाठीच केंद्राने घाईघाईने राज्याकडून तपास काढून घेतला, असा आरोपही शरद पवारांनी केला.

Sharad Pawar UNCUT | अन्यायाविरोधात बोलणं म्हणजे नक्षलवाद नाही - शरद पवार