CM Eknath Shinde : शासकीय कामांच्या बैठकांसाठी मी दिल्लीत आलो आहे. दौऱ्याचा आणि मंत्रीमंडळ विस्ताराचा अर्था अर्थी काही संबंध नसल्याचे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज एक बैठक आयोजीत केली आहे. त्या बैठकील मी उपस्थित राहणार आहे. तसेच उद्या निती आयोगाची बैठक होणार आहे. ती दरवर्षी होते. या दोन्ही महत्वाच्या बैठकांसाठी मी आलो असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदे दिल्ली विमानतळावर दाखल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.


प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंत्रीमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारला. यावेळी लवकरच मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असल्याचे शिंदेंनी सांगितले. मंत्रीमंडळाचा विस्तार होण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नाही. खात्यांची जबाबदारी सचिवांकडे दिली आहे. कोणत्याही खात्याचे काम थांबवले नसल्याचेही शिंदे यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते घेत आहेत. 


भंडाऱ्यात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेसंदर्भात देखील मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेबाबत कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. याबाबत कठोर कारवाई केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. मदतीचं आश्वासन देऊन 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भंडाऱ्यात घडली आहे. तीन नराधमांनी दोन ठिकाणी नेऊन महिलेवर अत्याचार केले. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी महिलेल्या रस्त्याकाठी फेकून देत तिथून पळ काढला. सध्या महिलेवर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी एक वाजता नवी दिल्लीत पोहोचले आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आधीच दिल्लीत दाखल झाले आहेत. काही शासकीय कामांसाठी या दोघांचा दिल्ली दौरा असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आज आणि उद्या हे दोन्ही नेते दिल्लीत असतील. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबतही या दोन्ही नेत्यांची बैठक होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, सोमवारी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा करण्यात येईल, असेही म्हटले जात आहे. 


महत्वाच्या बातम्या: