Maharashtra Assembly Session : लोकायुक्तांचं विधेयक मंजूर करण्याचा या विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रयत्न असेल. सर्व पक्षांनी लोकायुक्ताच्या कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी केले आहे. उद्यापासून विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
उद्यापासून सुरू होत असलेल्या अधिवेशनात लोकहिताचे निर्णय घेतले जातील. विरोधकांनी विधीमंडळात लोकहिताचे मुद्दे मांडवेत. त्यांच्या प्रश्नावर उत्तरं द्यायला आम्ही तयार आहोत, असं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबरोबरच विरोधी नेत्यांना धमकी देण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. त्याची चौकशी करण्यात येईल. परंतु, संजय राऊत हे सनसनाटी निर्माण करण्यासाठी असं काही तरी वक्तव्य करत असतात, असा आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. कोणीतरी शाईफेक करणार असल्याची माहिती मिळाली असल्याचा जबाब संजय राऊत यांनी दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
विरोधकांनी सकारात्मक मुद्दे मांडावेत, त्याच्यावर चर्चा केली जाईल. या अधिवेशनातून आम्ही जनतेच्या प्रश्नांवर भर देऊ. रखडलेल्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. मुंबईतील प्रकल्पांचं काम वेगात सुरू आहे. या अधिवेशनात धोरनात्मक निर्णय होतील. विरोधकांनी आज चहापानावर बहिष्कार घातला. त्यांच्यासोबत चहापान टळलं हे बरंच झालं. सत्ता गेल्यामुळे विरोधक वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे आम्ही समजू शकतो. लोकशाहीत बहूमताला महत्व आहे. आमचं सरकार हे बहूमताचं सरकार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
आरोप करताना त्याला पुरावे पाहिजेत. धमक्या दिल्याचे खोटेनाटे आरोप केले जात आहेत. नारायण राणे यांना जेवत्या ताटावरून उठवलं, केतकी चितळेला तुरूंगात टाकलं, कंगना रणौतच घर तोडलं. गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा प्रयत्न केला, देवेंद्र फडणवीस यांना तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, आमच्यावर आता खोटेनाटे आरोप करत आहेत. आम्हाला लोकांचं प्रेम मिळत आहे, त्यामुळे अजित पवार यांच्या पोटात दुखत आहे. वर्षा बंगल्यावर लोक भेटायला आल्यानंतर त्यांना चहापाणी द्यायला पाहिजे का नको? ही आपली संस्कृती आहे. परंतु, यावरून अजित पवार आरोप करत आहेत. त्यांनी दिवसातून तीन वेळा भूमिका बदलल्या. पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.