Madhuri Elephant: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी मठातील महादेवी हत्तीणीची रवानगी वनतारामध्ये करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या विरोधानंतर आता राज्य सरकारने पुढाकार घेत सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनरावलोकन याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आज वनताराच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. यावेळी वनतारानेही सकारात्मक भूमिका घेत राज्य सरकारला न्यायालयीन प्रक्रियेत सहकार्य करण्यास तयारी दर्शवली आहे. वनताराशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत माहिती दिली.
याचिकेत वनताराही सहभागी होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, महादेवी हत्तीण (माधुरी) पुन्हा सुखरुप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जी याचिका करण्याचे ठरविले, त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनताराने घेतला असल्याचे त्यांनी मला आश्वस्त केले आहे. या चर्चेदरम्यान त्यांनी मला सांगितले की, आम्ही केवळ मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठानजीक वन विभागाने निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनताराने दर्शविली आहे. विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी
दुसरीकडे, नांदणी मठातील माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजितपवार, वन मंत्री गणेश नाईक, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह नांदणी मठाचे प्रतिनिधी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार सर्वश्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, विश्वजीत कदम, सतेज पाटील, अशोक माने, सदाभाऊ खोत, राहुल आवाडे, अमल महाडिक, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार प्रकाश आवाडे, नांदणी मठाचे पूज्य स्वस्तीश्री जिनसेन महास्वामीजी, जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्य जीव) श्रीनिवास राव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे आदीसह जैन स्वामीव स्थानिक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या