पालघर : संपूर्ण देशात सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका घोंघावत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात आता पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यानं एक पाऊल पुढे टाकलंय. जव्हारच्या अतिदुर्गम भागात आता ड्रोनद्वारे लसपुरवठा करण्याचा नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात आला आहे. हा प्रयोग शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ब्लु इन्फिनीटी इनोवेशन लॅब व आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने राबविण्यात आला आहे. यामुळे दुर्गम भागात जलद गतीनं लस पोहोचवणं शक्य होणार आहे.
सध्या सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली कामे जलद व सुलभ करण्यासाठी प्रत्येक विभाग धडपड करत आहे. पालघरसारख्या आदिवासी बहुल असलेल्या आणि जव्हार मोखाडा सारख्या डोंगर भागात जलद लसीचे डोस पोहोचवण्यासाठी अनेक अडचणी आल्या यावर मात करण्यासाठी ड्रोनची मदत घेऊन आता हे डोस या गावापर्यंत पोहचवले जाणार आहेत. जव्हारमधील झाप येथे आज लसीचे 300 ड्रोनच्या मदतीने पाठवण्यात आले असून या ड्रोनची क्षमताही पंचवीस किलोमीटर पर्यंत पाच किलो वजन वाहून नेण्याची असल्याने तसेच 20 किलोमीटरचा प्रवास हा अवघ्या नऊ मिनिटात होणार असल्याच्या यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आलं.
लसीसोबतच पुढील काळात अत्यावश्यक असलेली औषधे , प्रत्यारोपणाकरता अवयव ,रक्त याची अत्यावश्यकता असल्यास वेळेत पोहोचवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे . तर राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेथे रस्ते आणि इतर सुविधा नसतील अशा ठिकाणी तातडीच्या जीवनावश्यक वस्तू पाठवण्यासाठी सुद्धा या ड्रोन चा उपयोग होऊ शकतो तसेच या प्रयोगानंतर राज्यातील नंदुरबार गडचिरोली व इतर दुर्गम भागांमध्ये ही योजना राबवण्याचा विचार आहे असं मत आज जव्हार येथे पार पडलेल्या या प्रत्यक्षिक वेळी अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग डॉक्टर प्रदीप व्यास यांनी व्यक्त केलं
पालघरच्या जव्हार मोखाडासारख्या अतिदुर्गम भागात आजची आरोग्य व्यवस्था मोडकळीस आलेले पाहायला मिळते. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे ड्रोनद्वारे मिळणाऱ्या सुविधेमुळे आरोग्य विभागाला अनेकांचे जीव वाचवता येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Mumbai Omicron : मुंबईत 35 टक्के डेल्टा तर 2 टक्के ओमायक्रॉन, जिनोम सिक्वेसिंगच्या चाचणीचे निष्कर्ष
- Corona Variant Omicron : चिंता वाढली! देशात ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव
- Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात गुरुवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही तर 877 नव्या कोरोनाबाधितांची भर