मुंबई : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अशा समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज 146 वी जयंती. पण कोरोना व्हायरसच्या संकटामुळे ही जयंती कोल्हापूरमध्ये अत्यंत साधेपणाने करण्यात आली.

आज कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत शाहू जयंती सोहळा पार पडला. कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये येऊन मान्यवरांनी शाहू महाराजांना अभिवादन केलं. या जयंतीच्या निमित्ताने कोल्हापूरमधल्या दसरा चौकातील शाहू महाराज यांचा पुतळाही सजवण्यात आला असून दरवर्षी या जयंतीच्या निमित्ताने मिरवणुका आणि शोभा यात्रांचे आयोजन केलं जातं. पण यंदा साधेपणाने शाहू महाराज जयंती साजरी करण्याचा निर्णय करवीरवासियांनी घेतला.


शिक्षणाद्वारे जातिभेद निर्मूलन, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्यांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रियांच्या प्रगतीसाठी स्त्री शिक्षणास प्रोत्साहन अशा विधायक कार्याद्वारे सामाजिक न्यायाचा नवा अध्याय लिहीणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना जयंती दिनी विनम्र अभिवादन, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आदरांजली अर्पण केली आहे. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक असून त्याच विचारांवर राज्याची वाटचाल सुरु आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राजर्षी शाहू महाराजांनी उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढलं
राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वारसा समर्थपणे पुढे नेला. उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी पुरोगामी, क्रांतिकारक विचार दिला. बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृहे सुरु केली. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी धरणे बांधली. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक विचार त्यांनीच खऱ्या अर्थानं पुढे नेला.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली, त्यांना प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा निर्मुलन, अस्पृश्यता निवारणाचं काम केलं. अनिष्ट प्रथा, वाईट रुढी, चुकीच्या परंपरांवर बंदी घातली. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत, आपल्या राज्यात त्यासंबंधीचा कायदा केला. सामाजिक न्यायाचे, आरक्षणाचे जनक असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी, प्रगत, दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे नेहमीच आपल्यासाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले आहे.

समता आणि सर्वांगिण विकास या द्वीसुत्रीचा कायम आग्रह धरणारे लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आदरांजली वाहिली आहे.