अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाच्या नदीपात्रात अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात केमिकलची पोती टाकली. धक्कादायक म्हणजे पोती नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे हे उग्र आणि जीवघेणे केमिकल पावसाच्या पाण्यासोबत धरणात जाण्याची भीती असून तसं झाल्यास ते हजारो अंबरनाथकरांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.
अंबरनाथच्या पूर्व भागात वास्तव्यास असलेल्या सुमारे एक लाख नागरिकांना चिखलोली धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सध्या जलसंपदा विभागाच्या लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या धरणातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जलशुद्धीकरण करून नागरिकांना पाणी पुरवलं जातं. अंबरनाथ एमआयडीसीच्या मागच्या बाजूला असलेल्या डोंगरातून वाहत येणारा धबधबा हा या धरणाचा मुख्य जलस्त्रोत आहे. मात्र या धबधब्याच्या मार्गातच काही अज्ञातांनी जीवघेण्या केमिकलची पोती टाकली आहेत.
अजून पुरेसा पाऊस झालेला नसल्यानं धबधबा सुरू झालेला नाही. मात्र, त्यानंतर डोंगरावरून येणारं पाणी हे सारं केमिकल घेऊन धरणात जाईल, आणि अनर्थ होईल. या धबधब्याच्या मार्गात टाकलेल्या केमिकलच्या काही पोत्यांवर मेड इन मलेशियाचा, तर काही पोत्यांवर पैठण एमआयडीसीत असलेल्या क्रिस्टल कंपनीचा शिक्का आहे. त्यामुळं ते अंबरनाथ एमआयडीसीमधील एखाद्या रासायनिक कंपनीनं आयात केलं असावं आणि काम झाल्यावर त्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट न लावता इथे टाकून दिलं असण्याची शक्यता आहे. मात्र यामुळं इथल्या स्थानिकांमध्ये धास्तीचं वातावरण आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या धरणाच्या नदीपात्रात हे केमिकल 15 ते 20 दिवसांपासून टाकलं जात असल्याचं सांगितलं जात असून याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, तसंच स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रार देण्यात आल्याचं सामाजिक कार्यकर्ते सचिन गुडेकर यांचं म्हणणं आहे. मात्र अजूनही कुणीही हा धोका ओळखून कारवाईला गती दिलेली नाही.
या सगळ्या प्रकाराबाबत ‘माझा’नं अंबरनाथ एमआयडीसीतील कंपन्यांची संघटना असलेल्या ‘आमा’चे (Additional Ambarnath Manufacturers Association) अध्यक्ष उमेश तायडे यांना गाठलं असता त्यांनाही याबाबत नीट काही सांगता आलं नाही. मात्र कुणी दोषी आढळलंच, तर कारवाई करू, असं तद्दन आश्वासन मात्र त्यांनी दिलं.
अंबरनाथ एमआयडीसीमध्ये सध्या 87 रासायनिक कंपन्या असून त्यांच्यातून तयार होणारा कचरा तळोजा इथल्या रासायनिक डम्पिंग ग्राउंडवर नेऊन टाकण्याचे निर्देश आहेत. मात्र तरीही काही कंपन्या अगदी थोडेसे पैसे वाचवण्याच्या नादात असले प्रकार करतात. मात्र त्याचे परिणाम किती गंभीर आहेत, हे त्यांना लक्षात येत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.