मुंबई : दहावीचा निकाल लागल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थी आता कॉलेजमध्ये अकरावीत प्रवेश मिळवण्यासाठी उत्सुक झाले आहेत. महाविद्यालयात आजपासून (16 जून) अकरावी प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरु होत आहे.


अकरावी प्रवेशासाठी चार गुणवत्ता याद्या जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक विभागाने जाहीर केलं आहे.

यासाठी विद्यार्थ्यांनी याआधीच पहिला अर्ज भरला असून दुसरा अर्ज त्यांना उद्यापासून भरता येणार आहे. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 27 जूनपर्यंत आहे. 30 जूनला अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना यंदा गुणवत्ता यादीनुसार पसंतीक्रम भरावा लागणार आहे.

आज दुपारी तीन वाजता http://mumbai.11thadmission.net/  या वेबसाईटवर अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होईल.

शिक्षण उपसंचालक विभागातर्फे जाहीर केलेल्या चार गुणवत्ता याद्यांमध्येही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नसतील तर पाचवी यादी जाहीर करण्यात येणार आहे. अकरावी ऑनलाईनची सर्व प्रक्रिया 3 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे.

असं आहे अकरावी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक!

- ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा - 16 ते 27 जून

- सर्वसाधारण यादी जाहीर होण्याची तारीख - 30 जून, संध्याकाळी 5 वाजता

- अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची तारीख - 1 ते 3 जुलै, संध्याकाळी 5 वाजता

* पहिली यादी

- पहिली गुणवत्ता यादी - 7 जुलै, सायंकाळी 5 वाजता

- पूर्ण फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख - 8, 10, 11 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत

* दुसरी यादी

- दुसऱ्या यादीसाठी गरज असल्यास पसंतीक्रम बदलण्याची तारीख - 12 ते 13 जुलै, सायंकाळी 5 वाजेपर्यंत

- दुसरी गुणवत्ता यादी - 17 जुलै, संध्याकाळी 5 वाजता

- फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख - 17 ते 19 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजता

* तिसरी यादी

- तिसऱ्या यादीसाठी गरज असल्यास पसंती क्रम बदलण्याची तारीख - 20 ते 21 जुलै, संध्याकाळी 5 वाजता

- तिसरी गुणवत्ता यादी - 25 जुलै, संध्याकाळी 5 वाजता

- फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख - 26 ते 27 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजता

* चौथी यादी

- चौथ्या यादीसाठी आवश्यक असल्यास पसंतीक्रम बदलण्याची तारीख - 28 ते 29 जुलै, सायंकाळी 5 वाजेपर्यंत

- चौथी गुणवत्ता यादी - 1 ऑगस्ट, संध्याकाळी 5 वाजता

- फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख - 2 ते 3 ऑगस्ट, सकाळी 10 ते 5 वाजता

कट ऑफमध्ये वाढ होण्याची शक्यता

यंदा मुंबईतील पैकीच्या पैकी म्हणजे 100 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थीही आहेत. तर 10 हजार 157 विद्यार्थ्यांना 90 आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यातही 95 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परिणामी यंदाच्या नामांकित कॉलेजची सायन्सची कटऑफ 93 टक्क्यांपर्यंत बंद होण्याचा अंदाज आहे.

आर्ट्स शाखेतून स्पर्धा परीक्षांसह इतर इंटिग्रेटेड कोर्सचा पर्याय खुला असल्याने विद्यार्थ्यांचा ओढा कला शाखेकडे वाढला आहे.

तर कॉमर्सलाही चांगली मागणी आहे. मुंबईतील कॉलेजमध्ये सर्वाधिक जागा या वाणिज्य शाखेच्याच आहेत. या शाखेच्या कटऑफमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

अकरावीच्या उपलब्ध जागा

- अल्पसंख्याक, इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा - 1 लाख 32 हजार 408

- ऑनलाईन प्रवेश - 1 लाख 59 हजार 682

- एकूण जागा - 2 लाख 92 हजार 90

2016 मधील कट ऑफ

कला : जास्तीत जास्त 94.4% ते कमीत कमी 80%

वाणिज्य : जास्तीत जास्त 94.5 % ते कमीत कमी 89.8%

विज्ञान : जास्तीत जास्त 93.2 % ते कमीत कमी 91%