पालघर : कोरोना संक्रमणाच्या काळात लॉकडाऊनमध्ये चोर समजून पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे दोन साधू आणि वाहन चालकाची जमावाकडून निर्घृण हत्त्या करण्यात आली होती. बुधवारी या प्रकरणी 90 दिवस पूर्ण झाले असून डहाणू न्यायालयात 126 आरोपीं विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून यामध्ये पोलीस उपअधिक्षक विजय पवार यांनी 4995 पानांचे तर उपअधिक्षक इरफान शेख यांनी 5921 पानांचे अशी दोन आरोपपत्र डहाणू न्यायालयात दाखल केली आहेत. ही माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून देण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचेही सांगण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे दोन साधू आणि वाहन चालकाची जमावाकडून निर्घृण हत्त्या करण्यात आली होती. याप्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई तर 35 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात आलं आणि त्यानंतर तत्कालीन पालघर पोलीस अधिक्षक यांना ही सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते.
कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले येथे जमावाने 14 एप्रिलला तिघांची निर्घृण हत्त्या केल्यानंतर या प्रकरणी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद कासा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास 21 एप्रिलपासून राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला. याचे नेतृत्व पोलीस अधीक्षक मारुती जगताप हे पाहत होते. याप्रकरणी 808 संशयित आणि 108 साक्षीदारांकडे तपास करून ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात झाली. याप्रकरणी 165 जणांना अटक करण्यात आली होती. यामध्ये 11 अल्पवयीन मुलांचा समावेश होता. यापैकी कुणालाही जामीन मंजूर झालेला नाही.
पाहा व्हिडीओ : पालघर हत्याकांड प्रकरणी सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस
काय आहे प्रकरण?
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी असताना कांदिवली (मुंबई) येथून गुजरात राज्यात आडमार्गाने प्रवेश घेऊ पाहणार्या चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी (70 वर्ष), सुशिलगिरी महाराज (35 वर्ष), निलेश तेलगडे (30 वर्ष) या तिघांची महाराष्ट्र व दादरा नगरहवेली केंद्रशासित प्रदेशाच्या हद्दीजवळ डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गावकऱ्यांनी अमानुषपणे मारहाण करून निर्घृणपणे हत्या केली होती.
महत्वाच्या बातम्या :
पालघर हत्याकांड | गृहमंत्री म्हणाले, घटनेला जातीय रंग देणं दुर्दैवी, आरोपींची नावं जाहीर
पालघर हत्याकांड आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही, राजकारण करु नका : शरद पवार
पालघर जमाव हत्याकांड : 101 आरोपींना पोलीस कोठडी; तर अल्पवयीन 9 जणांची बालसुधारगृहात रवानगी