Changes from 1st April 2022 : आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2022-2023 सुरू झाले आहे. या नव्या आर्थिक वर्षातील पहिल्या महिन्यात आर्थिक बाबतीत काही मोठे बदल होणार आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. दुसरीकडे आज सामान्यांच्या जीवनाशी संबंधित अन्य काही गोष्टीही बदलत आहेत. आजपासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटणार आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.  सर्वात महत्वाचं म्हणजे आजपासून आयकर नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) आयकर (25 वी सुधारणा) नियम 2021 अंतर्गत 1 एप्रिलपासून आयकर नियमांमध्ये अनेक मोठे बदल होणार आहेत. 


आजपासून आपल्या आयुष्यात काय काय बदलत आहे, याविषयी जाणून घेऊयात...


आजपासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटणार


आजपासून महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध (Maharashtra to lift all Covid-19 Restrictions ) हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधपासन मुक्तता मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. 


महाराष्ट्रात आजपासून काय काय बदलणार? 
- 1 एप्रिलपासून महाराष्ट्रात करोनाचे सर्व निर्बंध हटतील
- मार्च 2020 ते 31 मार्च 2022 जवळपास दोन वर्षे लागू असलेले कोरोनाचे निर्बंध संपुष्टात येतील
- गुढीपाडवा शोभायात्रा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रमजान उत्साह साजरा करता येणार
- केंद्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती आणि सोशल डिस्टन्सिंग कायम असेल
- मात्र महाराष्ट्राच्या निर्णयानुसार मास्कसक्ती नसेल, मास्क लावणे ऐच्छिक असेल
- हॉटेल, उद्याने, जीम, सिनेमागृह, शैक्षणिक संस्थामधील उपस्थिवर मर्यादा नाही
- लग्न किंवा कौटुंबीक कार्यक्रम, सोहळे, अंत्ययात्रांमधील उपस्थितींवर मर्यादा नाही.
- बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लशीचं प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. 
- सार्वजनिक ठिकाणं, मॉल, बगिचे याठिकाणी मास्क वापरणे किंवा लशीचं प्रमाणपत्र धाखवण्याची गरज भासणार नाही.
- महारष्ट्रभरात सर्वधर्मीयांचे सर्व उत्सव निर्बंधमुक्त असतील, यात्रा-जत्रा धुमधडाक्यात होणार
- निर्बंधामुळे उद्योग आणि व्यवसायांवर आलेली बंधनं हटली आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल. 


जाणून घ्या आजपासून होणारे अन्य महत्वाचे बदल 


औषधांचे दर वाढणार 


1 एप्रिलपासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससह अत्यावश्यक औषधांच्या किमती वाढणार आहेत. सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. यामुळे सुमारे 800 औषधांच्या किंमती वाढणार आहे.


पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना धक्का


1 एप्रिल 2022 पासून पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना आयकर कायद्याच्या कलम 80EEA अंतर्गत मिळणारा लाभ केंद्र सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 


गॅस दर वाढ होणार?


इंधन दरवाढ सुरू असताना आता घरगुती एलपीजी गॅस दरवाढीची झळ ग्राहकांना बसू शकते. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली होती. 1 एप्रिल रोजी नवीन दर जाहीर होण्याची शक्यता आहे. 


पोस्ट ऑफिसच्या नियमांत बदल


1 एप्रिल 2022 पासून पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) आणि मुदत ठेव खात्यांवरील व्याजाचे पैसे फक्त बचत खात्यात उपलब्ध असतील. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही व्याजाचे पैसे रोखीने घेऊ शकत नाही. सरकारने MIS, SCSS, टाइम डिपॉझिट खात्यांच्या बाबतीत मासिक, त्रैमासिक, वार्षिक व्याज जमा करण्यासाठी बचत खाते वापरणे अनिवार्य केले आहे.


म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे नियम


म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे पैसे चेक, बँक ड्राफ्ट किंवा रोखीने देता येणार नाहीत. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला युपीआय अथवा नेटबँकिंगचा वापर करावा लागणार आहे. 


पीएफ खात्यावर कर


एक एप्रिल 2022 पासून विद्यमान पीएफ खाते दोन भागांमध्ये विभागले जाऊ शकते. त्यावर कर आकारणी होऊ शकते. ईपीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपर्यंत करमुक्त योगदानाची मर्यादा लागू केली जात आहे. शासकीय  कर्मचाऱ्यांच्या जीपीएफमध्ये करमुक्त योगदानाची मर्यादा वार्षिक 5 लाख रुपये आहे.


जीएसटी नियमात बदल


CBIC (केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ) ने वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत ई-इनव्हॉइस जारी करण्याची उलाढाल मर्यादा 50 कोटी रुपयांच्या पूर्वीच्या निश्चित मर्यादेवरून 20 कोटी रुपये केली आहे. 


ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवीचा विशेष लाभ बंद?


कोरोना काळात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक यासह ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष एफडी योजना सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर अधिक लाभ मिळत होता. आता काही बँका या योजना बंद करण्याची शक्यता आहे. 


क्रिप्टोकरन्सीवर 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू


क्रिप्टोकरन्सीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लागू होणार आहे. व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता (VDA) किंवा क्रिप्टोकरन्सी विकून मिळालेल्या नफ्यावर 30 टक्के कर लागणार आहे. 


वाहने महागणार
काही वाहन कंपन्यांनी 1 एप्रिलपासून त्यांच्या वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने 1 एप्रिलपासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2 ते 2.5 टक्क्यांनी वाढवणार असल्याचे म्हटले आहे. मर्सिडीज-बेंझ इंडियाने 1 एप्रिलपासून आपल्या वाहनांच्या किमतीत तीन टक्क्यांपर्यंत वाढ करणार असल्याचेही म्हटले आहे. टोयोटा 1 एप्रिल 2022 पासून आपल्या वाहनांच्या किमती 4 टक्क्यांनी वाढवणार आहे. BMW किमती 3.5 टक्क्यांनी वाढवणार आहे.



संबंधित बातम्या


Income Tax : आयकर नियमांमध्ये आजपासून मोठे बदल! नेमकं काय काय बदललंय? वाचा एका क्लिकवर


Covid-19 Restrictions : आजपासून महाराष्ट्र निर्बंधमुक्त; दोन वर्षांनंतर कोरोनाच्या नियमांपासून सुटका, मास्क सक्ती नाही


Income Tax : आयकर नियमांमध्ये आजपासून मोठे बदल! नेमकं काय काय बदललंय? वाचा एका क्लिकवर