पोलिस भरतीसाठी आधी 100 गुणांची मैदानी चाचणी घेतली जायची आणि त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जायची. अशाप्रकारे 200 गुणांमधून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांची पोलिस म्हणून भरती व्हायची. परंतु आता राज्य सरकारने यामध्ये बदल केला असून लेखीपरीक्षा मैदानी चाचणीच्या आधी घेण्यात येणार आहे. तर मैदानी चाचणीचे गुण 100 वरुन 50 करण्यात आले आहेत.
या दोन बदलांना पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या हजारो तरुण-तरुणींनी विरोध केला आहे. मागील पाच वर्षांपासून महाराष्ट्रात पोलिसांच्या फक्त रिक्त जागा भरल्या जात आहेत. नवीन पोलिस भरती झालेली नाही. त्यामुळे पोलिस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
आंदोलन करणारे हे तरुण-तरुणी पुण्यातून मुंबईला धावत जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार होते. मात्र महामार्गावरुन धावत जाण्यासाठी त्यांना परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आता या तरुण-तरुणींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.