परभणी : राज्यातील ग्रामीण भागात काळी माती आणि पाण्यामुळे वारंवार खचणाऱ्या रस्त्यांची अवस्था फार वाईट आहे मात्र शासनाला यावर उपाय सुचला आहे. ग्रामीण भागातील रस्ते दीर्घकालीन टिकावेत म्हणून आता जिओ टेक्स्टाईल मटेरियल टाकून रस्ता तयार केला जात आहे. राज्यातील पहिला प्रयोग परभणीत करण्यात येत आहे, अशा पद्धतीने रस्ता तयार करण्याची राज्यातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे खराब असलेल्या रस्त्यांचे आता भाग्य उजळणार आहे.

राज्यात गावखेड्यातून शहराला अथवा तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची अवस्था स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडल्या नंतरही कायम आहे. आजही अनेक तांड्या, वस्त्यांना जाण्यासाठी रास्ता नाही. हे रस्ते प्रामुख्याने डांबरीकरणाने केली जातात. मात्र डांबरी रस्ता तयार केल्यानंतर खालच्या काळ्या माती आणि पाण्यामुळे काही काळातच हा रस्ता खड्डेमय होतो, अनेक ठिकाणी खचला जातो. वारंवार रस्ता करुनही काही दिवसातच ते रस्ते पुन्हा जशास तसेच होतात. मात्र यावर आता शासनाने पर्याय शोधलाय जे डांबरी रस्ते काळी माती आणि पाण्यामुळे तग धरत नव्हते ते यापुढे जिओ टेक्स्टाईल मटेरिअल या नवीन तंत्राद्वारे दीर्घकाळ टिकतील, असा दावा करण्यात आला आहे. परभणीत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत साडेगाव ते मांगणगाव या सहा किलोमीटर च्या रस्त्याचे काम 4 कोटी 98 लाख रुपये खर्चून केला जात आहे, ज्यात जिओ टेक्स्टाईल मटेरिअलच्या चादरचा वापर होत आहे.

परभणी तालुक्यातील साडेगाव ते मांगणगाव हा रस्ता मागच्या अनेक वर्ष खराब होता, ज्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करत परभणी गाठावे लागायचे. मागच्या दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत लातूरच्या आशीर्वाद कन्ट्रक्शनला हे काम देण्यात आलं आहे. ते नवीन तंत्राचा वापर करुन हे काम करत आहेत. हा रस्ता जिओ टेक्स्टाईल मटेरिअलच्या प्लास्टिक कोटेडच्या सहाय्याने तयार केला जात आहे. सुरुवातीला रस्त्यावर मुरुमाचा थर टाकून त्याला दबईने दाबून त्यानंतर त्यावर जिओ टेक्सटाईल मटेरियल वापरलं जात आहे. या मटेरियलवर पुन्हा एका मुरुमाच्या थरानंतर गिट्टीचे दोन थर आणि त्यानंतर डांबरीकरण केले जाणार आहे. एकूण 54 सेंमीपर्यंत जाडीचा हा रस्ता होणार असल्याने, त्यावर एक विशिष्ट प्रकारचा लेअर तयार होतो. जो पाणी रस्त्यावर थांबू देत नाही, शिवाय खालीही पाणी मुरत नसल्याने रस्त्याचे आयुर्मानही वाढते.

काय आहे नेमकं जिओ टेक्स्टाईल मटेरियल आणि त्याचा फायदा?

- प्लास्टिकच्या विविध कचऱ्यापासून याची निमिर्ती केली जाते
- तांत्रिक प्रक्रिया केलेला प्लास्टिक कचरा, गिट्टीची चुरी, नायलॉन आणि डांबर असे मिश्रण
- हवं त्या मापाप्रमाणे याची चादर तयार केली जाते
- रस्त्यांच्या मध्यभागी हे वापरल्याने एक वेगळा लेअर तयार होतो
- तो लेयर पाणी वरही थांबू देत नाही आणि खाली मुरुही देत नाही.

एकूणच मागच्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यांवरील प्रवासामुळे साडेगाव इथले ग्रामस्थ वैतागले होते. मात्र या रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार असल्याने ते समाधान व्यक्त करत आहेत. शिवाय मागच्या रस्त्यांच्या कामांप्रमाणे याकडे दुर्लक्ष न करता गुणवत्तेकडे लक्ष देण्याची मागणीही करत आहेत.

राज्यातील वाड्या-वस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या संख्येत वाढ आणि सध्या दूरवस्था असेल्या रस्त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. या योजनेंतर्गत राज्यातील 30 हजार किमी रस्त्यांच्या दर्जा वाढीसाठी 13 हजार 500 कोटी तर 730 किमीच्या नवीन रस्त्यांच्या जोडणीसाठी 328 कोटी असा एकूण 13 हजार 828 कोटी खर्च अपेक्षित आहे. ही योजना ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत राबवण्यात येणार आहे.