Beed Lok Sabha : एकीकडे उन्हाचा पारा वाढत आहे, तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण देखील तापत आहे. अशात नेतेमंडळी प्रचाराच्या माध्यमातून निवडणूक आपल्यासाठी सोपी कशी होईल यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यावर आपल्यासाठी निवडणूक खूप अवघड असे मला वाटले होते, पण आता जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याने सोपी झाली असल्याचं पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटले आहे. 


एका प्रचारसभेत बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, "मला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेकांचे फोन आले, अनेकांनी भेटून मला सांगितलं की, ताई आता तुम्ही स्वतः उमेदवार आहेत. आता कसं होईल. त्यामुळे ही निवडणूक खूप अवघड आहे असं मला देखील वाटलं होतं. पण आता जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याने सोपी झाली आहे. त्यामुळे माझ्यावर प्रेम करणारे लोकं ही निवडणूक सोपी करतील असं पंकजा मुंडे आपल्या भाषणात म्हणाल्या. तर, मी ग्रामविकास मंत्री असतांना अनेक वाडी, वस्ती, तांड्यापर्यंत रस्ते पोहोचवले. त्यामुळे आता ही निवडणूक सोपी व्हावी म्हणून अनेक अवघड रस्ते पार करून तुमच्यापर्यंत पोहोचत असल्याचं देखील पंकजा म्हणाल्यात. 


ऊसतोड कामगारांसोबत साजरा केला पाडवा!


भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज गुढीपाडव्यानिमित्त ऊसतोड कामगारांचा गाव असलेल्या धनगरवाडीत पाडवा साजरा केला. यावेळी पंकजा मुंडे यांनी गावातील ऊसतोड कामगार महिलांसोबत गुढी उभारली. स्वतः पंकजा मुंडे गुढी उभारण्यासाठी गावात आल्याने महिला देखील भावुक झाल्या होत्या. यावेळी पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या उज्वल भविष्याची गुढी उभारायचे असल्याचं सांगितलं. धनगर वाडीत आल्यावर मला माहेरला आल्यासारखं वाटलं असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. तर, ऊसतोड कामगार असले तरी निस्वार्थपणे हे लोक माझ्यावर प्रेम करतात, हे माझं भाग्यच आहे. या लोकांसाठी खूप काम करायचा आहे,  मी नसले तरीही माझं काम दिसलं पाहिजे असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 


पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे सामना! 


राज्याच्या राजकारणात बीड जिल्ह्याचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक निवडणुकीत या जिल्ह्याची चर्चा कायम पाहायला मिळते. दरम्यान लोकसभा निवडणुकीत देखील बीड जिल्ह्याची चर्चा पाहायला मिळत आहे. बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आले आहे. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना दुसऱ्यांदा लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असा सामना पाहायला मिळतोय. दोन्ही उमेदवार गावागावात जाऊन प्रचार करतात. मागील काही दिवसात झालेल्या राजकीय घडामोडी, पक्षांमधील बंडखोरी, मराठा,धनगर, ओबीसी आरक्षणासह इतर मुद्दे यंदाच्या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार हे 4 जून रोजीचं स्पष्ट होईल.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Bajrang Sonwane On Pankaja Munde : यांना सर्व काही आयतं आणि फुकट मिळालं, त्यामुळे किंमत कळणार नाही; बजरंग सोनवणेंचा मुंडे बहीण-भावावर पहिला हल्ला