चंद्रपूर : चंद्रपूरच्या वरोरामध्ये प्रेमात फसवणूक झाल्याने तरुणीने युवकाला बेदम चोप दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आंनदवन चौकात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.


संबंधित तरुण आणि तरुणीचे दोन वर्षांपासून संबंध होते. परंतु कालांतराने युवतीशी फारकत घेत युवक वेगळा झाला. लग्नाच्या आणाभाका विरल्या. मात्र युवती सतत युवकाच्या मागावर होती.

तरुणाने लग्नासाठी दुसऱ्या मुली पाहायला सुरुवात केल्याचं तरुणीला समजलं. मूळचा भंडाऱ्यातील असलेला हा तरुण काल (रविवार) एका परीक्षेसाठी वरोऱ्यात येणार असल्याची माहिती तरुणीला मिळाली. त्यानंतर तिने थेट वरोऱ्यात येऊन तरुणाला गाठलं आणि त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली.

पण, तरुण टाळाटाळ करत असल्याने संतप्त झालेल्या तरुणीने भर रस्त्यात त्याची जोरदार धुलाई केली. शेवटी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत दोघांना पोलिस ठाण्यात नेलं. तिथं दोघांच्या पालकांना बोलावून सामंजस्याने हे प्रकरण मिटलं. त्यानंतर त्यांनी एकमेकांविरोधात तक्रार देण्यास नकार दिला.