सातारा : खासदार उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाला माझ्याकडून कुठलाही खोडा नाही, त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील  यांनी सांगितले आहे. मी त्यांच्यासोबत काल बोललो. त्यांनी दिल्लीमध्ये पुढच्या आठवड्यात प्रवेश करतो असे सांगितले आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात तारीख ठरेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

नारायण राणे यांच्याबाबत भाजप मित्रपक्षांसोबत चर्चा करुन मगच त्यांचा भाजप प्रवेश निश्चित केला जाईल, असेही पाटील यावेळी म्हणाले. राणे यांच्यासाठी एखाद्याचा विरोध असेल तर त्याची समजूत काढली जाईल, असेही ते म्हणाले. राणेंचा प्रवेश निश्चित झाल्याशिवाय त्यांच्या मुलांच्या तिकीटाचा देखील निर्णय होणार नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उध्दव ठाकरे यांच्यासोबत बोलणार आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी ते म्हणाले की, कोणताही प्रवेश करताना शेवटच्या प्रक्रिया पूर्ण करणे उचित असते. ही नावं काही सिक्रेट नाहीत.  उदयनराजेंचा सोलापुरात प्रवेश नक्की झाले होते. त्यांनी म्हटले की मी दिल्लीत प्रवेश करणार. शेवटी ते राजे आहेत, असे पाटील म्हणाले.

एक तारखेपर्यंत ज्यांची त्यांचा पक्ष सोडण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे, त्यांना एक तारखेला आणि बाकी राहिलेल्या लोकांचा प्रवेश पाच तारखेला होईल, असे पाटील म्हणाले.

यावेळी पाटील म्हणाले की, शरद पवार साहेब का चिडले हे मी सांगू शकत नाही. मात्र पक्षात कुणी कोणाला घेऊन जात नसतं. ती काही लहान मुलं नाहीत. जे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, त्यांना पाच वर्षात देशाचा आणि राज्याचा विकास पाहायला मिळाला आहे, असे पाटील म्हणाले. यावेळी पुढचा मुख्यमंत्री कोण? हे पक्ष श्रेष्ठी ठरवतील, असेही ते म्हणाले.

दरम्यान, 1 सप्टेंबरला सोलापुरात अमित शाहांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील तीन मोठ्या नेत्यांचा भाजप प्रवेश होणार आहे. त्यात मानचे आमदार जयकुमार गोरे, कोल्हापुरचे माजी खासदार धनंजय महाडिक आणि उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा समावेश आहे.