औरंगाबाद : 'शिवसेनेमध्ये स्किल पाहून इनकमिंग केलं जातं, जेणेकरुन त्यांचा महाराष्ट्राला उपयोग होईल', अशी माहिती युवासेनाप्रमूख आदित्य ठाकरे यांनी औरंगाबादेत दिली. नारायण राणे यांच्या संभाव्य भाजपप्रवेशावर प्रश्न विचारला असता आदित्य यांनी हे उत्तर दिले. आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन जन आशीर्वाद यात्रेच्या प्रतिसादाबद्दल माहिती दिली.


आदित्य ठाकरे म्हणाले की, "संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. मला शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागदेखील आवडतो. वरळीमधून विधानसभा निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्‍त केली आहे. त्यापूर्वीही मालेगाव, दिग्रस मतदारसंघातून मी विधानसभा लढवण्याची तिथल्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्‍त केली आहे"

निवडणूक लढवण्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, "जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मी मतदारांचे आभार मानत आहे. त्यांची मने जिंकत असताना मी विधानसभा निवडणूक लढायला हवी की नको? याविषयी जनतेची मतं जाणून घेत आहे. लोकांचा आदेश घेऊनच मी पुढे जाणार आहे. लोकांनी लढ म्हटले तरच मी निवडणूक लढणार"

'मला केवळ होर्डिंगवर कर्जमुक्ती दिसत आहे', असे म्हणत आदित्य यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका केली आहे.

आदित्य म्हणाले की, "राज्यापुढे बेरोजगारीचा मोठा प्रश्‍न आहे, त्याहीपेक्षा शेतकऱ्यांचा प्रश्‍न गंभीर आहे. शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा आक्रोश असल्याचे या जनआशीर्वाद यात्रेत दिसले. पीकविमा याजनेत फसवणूक झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्र्यांनीच यात त्रूटी असल्याचे मान्य केले आहे. तसेच कर्जमुक्ती झालेला एकही शेतकरी मला अद्याप भेटलेला नाही. यामुळे मी सरकारकडे त्रुटी दूर करण्याबाबत विनंती करेन"