Chandrakant Patil : जून महिना सुरु झाला की विद्यार्थ्यांची प्रवेशाची लगबग सुरु होते. प्रत्येकजण आपल्या आवडीच्या शाळेत, महाविद्यालयात प्रवेश घेत असतो. महाविद्यालयाच्या भरमसाठ फी मुळे अनेक मुलींना दुय्यम दर्जाचे शिक्षण घ्यावे लागते, किंवा शाळाच सोडावी लागते. काही जणांनी आत्महत्या केल्याचीही घटना घडल्या आहेत. परभणीमध्ये गेल्यावर्षी एका मुलीने महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारकडून मोफत शिक्षणाची मोठी घोषणा केली होती. शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक जून पासून राज्यात मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल, अशी घोषणा केली होती. पण जून महिना अर्धा उलटला पण सरकारचा जीआर निघाला नाही, किंवा अंमलबजावणी झाली नाही. प्रवेशामुळे मुलींना फी भरावी लागत असल्याचे समोर येते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसावेळी म्हणजे 9 फेब्रुवारी 2024 रोजी चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल अशी घोषणा केली होती. ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय,अभियांत्रिकी,लॉ,असो की 662 कोर्सेस असून यासाठी कुठलीही फी लागणार नाही, शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पण ही घोषणा हवेतच जिरल्याची चर्चा आहे. कारण, अर्धा जून महिना उलटला, महाविद्यालयात प्रवेशही सुरू झाले. मात्र राज्य सरकारचा ना जीआर निघाला, ना अंमलबजावणी झाली. प्रवेशासाठी मुलींना भरमसाठ फी भरावी लागतेय.
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रकांत पाटलांनी केलेली ती घोषणा हवेतच जिरली?
9 फेब्रुवारी 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येत्या जूनपासून राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हवेत जिरली असून विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी फी भरावी लागत आहे. चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेमुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये वादही होत आहेत.
जळगाव येथील कार्यक्रमात तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रात्री दोन वाजता फोन आल्याचे सांगत परभणीतील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका मुलीने फी भरण्यासाठी आत्महत्या केल्याची घटना समोर ठेवून एक जून पासून राज्यातील ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय,अभियांत्रिकी,लॉ,असो की 662 कोर्सेस असून यासाठी कुठलीही फी लागणार नाही, शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी ही एक जून पासून होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होत. महत्त्वाचं म्हणजे यासाठी किती बजेट लागणार आहे, याचा आकडाही त्यांनी आपल्या घोषणेत सांगितला होता. मात्र याचा उपयोग झाला नाही, जून महिना अर्धा संपलाय सर्वत्र प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यात. मात्र राज्यातील कुठल्याही महाविद्यालयाला सरकारचा अजूनही आदेशच मिळालेला नाही. विद्यार्थी आमची फीस माफ झाली असल्याचं महाविद्यालयांना सांगत आहेत, तर महाविद्यालय असं कुठलंही परिपत्रक आलं नसल्याचे सांगत आहेत. यामुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये वादही निर्माण होत आहेत.नेमकी चंद्रकांत पाटील यांनी काय घोषणा केली होती, पाहा....