Pune Crime news : मोफत कपडे नाकारल्यानंतर (Pune Crime news) दुकानाची तोडफोड करणाऱ्या टोळीला पुणे शहर पोलिसांनी यशस्वीपणे पकडले आहे. आरोपींना चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी अटक केली आहे. हंसराम प्रजापती यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 एप्रिल रोजी आरोपी खराडी येथील साईनाथनगर भागात अंजली कलेक्शन या कपड्याच्या दुकानात घुसले. तीन व्यक्तींनी दुकान मालकाला पैसे न देता कपड्यांची मागणी केली. दुकानदाराने विनंती ठामपणे नाकारली. दुकानदाराने नकार दिल्याने टोळक्याने दुकानाची तोडफोड केली.


त्यानंतर दुकानदाराने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यामुळे एफआयआर नोंदवण्यात आला. संकेत खोत आणि अन्य दोघे या घटनेत मुख्य संशयित असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांना तत्काळ पकडले आणि तोडफोड केलेल्या दुकानातून चोरीला गेलेल्या वस्तू जप्त केल्या. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कार्याचं अनेक स्थानिकांनी कौतुक केलं आणि त्याचे आभारही मानले. दुकानदार आणि स्थानिक रहिवाशांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांनी आरोपींना रस्त्यावर उतरवले.


या सगळ्या दुकानाची तोडफोड करणाऱ्या टोळीला जेरबंद केलं मात्र त्यापूर्वी या सगळ्या गुन्हेगारांची पोलिसांनी त्याच परिसरातून धींड काढली आहे. सध्या पुण्यात गुन्हेगारांची संख्या वाढत आहे. गुन्ह्यांचा तपास करणं, हे पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. गुन्हेगारी वाढत असल्याने पुण्यातील अनेक परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 


पुणे पोलिसांकडून गुन्हेगारांची थेट धिंड...


पुण्यातल्या सदाशिव पेठेत एका तरुणीवर कोयत्यानं झालेल्या हल्ल्यानंतर आता पुणे पोलिस अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. हातात कोयते घेऊन पुण्यात विविध ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून आता धिंड काढण्यात येत आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून टोळक्यांकडून हातात कोयते घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. दोन आठवड्यांपूर्वी पुण्याच्या सदाशिव पेठेत एका तरुणीवर तिच्याच मित्राकडून कोयत्यानं हल्ला करण्यात आला. त्या घटनेनं पुण्याचं पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं. आता तुम्ही हातात कोयता घ्याच, मग आम्ही तुम्हाला दाखवतो, असा सज्जड दम पोलिसांनी दिला आहे.


पुणे पोलिसांकडून कोयते दाखवून दहशत माजवण्याचा गुन्हा करणाऱ्या आरोपींवर कारवाईची सुरुवात करण्यात आली आहे. त्यात खुनी हल्ला करून फरार असलेल्या मंगेश माने नावाच्या आरोपीला पकडून पुणे पोलिसांनी त्याची धिंड काढली. दुसरीकडे एका नामांकित कॉलेजच्या परिसरात हातात कोयते घेऊन दहशत माजवणाऱ्या नऊजणांच्या टोळीचीही पोलिसांनी त्याच ठिकाणाहून "वरात" काढली.  पुणे पोलिसांच्या या अॅक्शन मोडमधून गुन्हेगारांवर वचक बसवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. खबरदार, कायदा हाती घेतलात तर, तुमचीही अशीच धिंड काढण्यात येईल, असा खाकी दमच पुणे पोलिसांकडून देण्यात आला आहे.