Chandani Chowk Flyover : चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या प्रकल्पाच्या उद्घाटनाला अजून दोन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या पुलाच्या गर्डरसाठी आवश्यक साहित्य अद्याप उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे या पुलाच्या उद्घाटनासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी या पुलाचं उद्घाटन होणार, अशी घोषणा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती.


उड्डाणपुलासाठी टाकण्यात येणाऱ्या गर्डरच्या कामासाठी लागणारी साधनं वेळेत उपलब्ध झाली नाहीत. त्यामुळे पुलाचे काम आणखी काही दिवस सुरु राहणार आहे. या उड्डाणपुलासाठी खांब उचलण्यात आले असून खांबांवर टाकण्यात येणारे काही गर्डर काँक्रिटीकरणाचं काम बाकी आहे. आवश्यक साधनं वेळेत उपलब्ध न झाल्याने काम रखडले आहे. ही साधने उपलब्ध झाल्यानंतर उर्वरित गर्डरचे काँक्रिटीकरण सुरु करण्यात येईल, असे एनएचएआयकडून स्पष्ट करण्यात आले.


एनडीए चौकातील उड्डाणपुलाचे आणि त्यातील रस्त्यांचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. फक्त गर्डर आणि पर्यायी रस्त्याचे काम बाकी आहे. त्यानुसार गर्डर टाकण्यापूर्वी या रस्त्यावरील वाहतूक दोन तास बंद ठेवण्याचे नियोजन सुरु आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.


मुळशी या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. गर्डर टाकण्याचे काम सुरु असताना रस्ता बंद करुन वाहतूक पर्यायी रस्त्यावर वळवण्यात आल्यानंतर या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे पत्रव्यवहार करुन वाहतूक वळवण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे एनएचएआयकडून स्पष्ट करण्यात आले.


एक रॅम्प वाहतुकीसाठी सुरु 


मुळशी आणि बावधनकडून साताऱ्याच्या मार्गाने जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात आहे. या मार्गासाठी तयार करण्यात आलेला रॅम्प सुरु करण्यात आला आहे. बहुतांश रॅम्पचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. अनेकांनी या नव्या रॅम्पवरुन प्रवासही केला आहे. 


चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार


मागील काही महिन्यांपासून चांदणी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलाचं काम सुरु असल्याने वाहतुकीसाठी मोठी समस्या निर्माण होत होती. चांदणी चौकातील हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी फुटणार असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या पूलाचं लोकार्पण झाल्यानंतर खरंच वाहतुकीत काही फरक जाणवेल का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.