MP Amol Kolhe on Jayant Patil Future CM : मुख्यमंत्री पदावरुन राष्ट्रवादीत (NCP) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नावाचे अनेक पोर्स्टर्स राज्यभरात झळकल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता एका नव्या दाव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. राष्ट्रवादीचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनी जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्यानं मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा व्यक्त केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, अमोल कोल्हेंनी जयंत पाटीलांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांना लोकसभेत पाठवा, असं आवाहनही केलं आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील असं वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे. शिवाय जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतिक पाटील यांना आमच्यासोबत लोकसभेत पाठवा, असं आवाहनही कोल्हे यांनी यावेळी बोलताना केलं आहे. दोन दिवसांपूर्वी सांगली दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात ते बोलत होते. अमोल कोल्हेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे.


दरम्यान, जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांची राजाराम साखर कारखान्याच्या संचालक पदी निवड झाली आहे. यानिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. 


पाहा व्हिडीओ : Amol Kolhe on Jayant Patil : जयंत पाटील मुंख्यमंत्री व्हावेत, प्रतीक पाटीलला लोकसभेत पाठवा



डॉ. अमोल कोल्हे बोलताना म्हणाले की, "जेव्हा पिता कतृत्त्ववान असतो, जेव्हा पिता इतका मोठा कतृत्व संपन्न असतो, महाराष्ट्र राज्याचं सर्वात जास्त वेळा अर्थमंत्रीपद ज्या माणसानं भूषवलंय आणि आजही ज्यांच्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राचा आदर्श मुख्यमंत्री म्हणून पाहतो, अशा कतृत्व संपन्न पित्याचं कतृत्व समोर असताना पित्याच्या कतृत्वाचा माज नाही, तर पित्याच्या कष्टाचं भान आणि पित्याच्या खांद्यावर असलेल्या जबाबदारीची जाण असलेलं युवा नेतृत्त्व म्हणून प्रतिक पाटील यांच्याकडे आज पाहावंस वाटतं." 


राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या तसेच, ते लवकरच वेगळा निर्णय घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आता भाकरी फिरवण्याची वेळ आली असल्याचं वक्तव्य केल्यानं राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यापूर्वीही ज्या-ज्यावेळी पवारांनी भाकरी फिरवायला हवी, असं वक्तव्य केलं आहे, त्या-त्यावेळी त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटल्याचे पाहायला मिळालं आहे. अशातच आता या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात काय पाहायला मिळणार? याची धाकधूक राजकीय वर्तुळात वाढली आहे. याच वेळी खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.  


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ABP C Voter Survey: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले तर, पुढची राजकीय समीकरणं काय? सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासे