Chalisgaon Rain Update : जळगावातील चाळीसगाव तालुक्यात पावसामुळं हाहाकार माजला आहे. जवळपास 800 जनावरं या पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पाच ते सात लोकंही वाहून गेल्याची भिती आहे. चाळीसगाव तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव शहर आणि ग्रामीण भागात पहाटे पावसाची कोसळधार पाहायला मिळाली. तितूर आणि डोंगरी नद्यांना मोठा पूर आला. या पुराचं पाणी जवळपास 15 गावांमध्ये शिरलं आहे. मोठी जिवीतहानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


जळगावातील पावसाचा जोर ओसरला असला तरी पुराचं पाणी मात्र अद्याप ओसरलेलं नाही. या पुराच्या पाण्यात जवळपास 800 जनावरं वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच 5 ते 7 नागरिकही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता असल्याची माहिती स्थानिक आमदार मंगशे चव्हाण यांनी दिली. चाळीसगाव औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळून वाहने अडकून पडल्याने त्यांना मोठ्या अडचणी ना समोर जावे लागत आहे,एक ट्रक दरीत कोसळत त्यात एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आमदार मंगेश चाव्हण यांनी दिली आहे. तालुक्यातील पूर परिस्थिती पाहता नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि एकमेकांना सहकार्य करावं, असं आवाहन मंगेश चव्हाण यांनी केलं आहे. 




जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे तितुर आणि डोंगरी नदीच्या पुराच पाणी पंधरा गावात शिरल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. यातील अनेक गावांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणत पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणी सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.


औरंगाबादच्या कन्नड घाटात 3 ठिकाणी दरड कोसळली, औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प


राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची कोसळधार पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळं औरंगाबादच्या कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. पहाटे दोन वाजल्यापासून औरंगाबाद धुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. औरंगाबाद-धुळे महामार्गावर कन्नड घाटात चिखलाचं साम्राज्य आहे. अनेक गाड्या अडकून पडल्या आहेत. ही दरड आणि हा राडा-रोडा जोवर दूर केला जात नाही, तोपर्यंत घाटातील वाहतूक सुरळीत होणं अशक्य आहे. 


कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतूकीसाठी बंद आहे, तरी नागरिकांनी प्रवासासाठी या रस्त्याचा वापर करु नये, औरंगाबादला जाण्यासाठी नांदगाव मार्गाचा वापर करावा, तसेच औरंगाबादहून येण्यासाठी जळगाव मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. 


दरम्यान, काही काळ विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय होत असल्याचं बघायला मिळत आहे. 22 ऑगस्टनंतर पावसाचा जोर महाराष्ट्रात कमी झाला होता त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. त्यात ऑगस्ट महिन्यात श्रावण सरी सर्वत्र होत नसल्यानं बळीराजावर संकट ओढवले होते. मराठवाड्याला याचा सर्वाधिक फटका बसला होता. त्याच महाराष्ट्रातील अनेक धरणांच्या पाणी पातळीत अपेक्षित अशी वाढ होत नसल्याचं बघायला मिळत नव्हतं. मात्र, आता छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानेतसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे.