मुंबई : 19 मार्च रोजी महाराष्ट्रातील शेतकरी व किसानपुत्र हे आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. किसानपुत्र आंदोलनाच्या आवाहानानुसार संपूर्ण महाराष्ट्रात तसेच देशातील काही राज्यात आणि जगातील काही देशात अन्नदात्यासाठी अन्नत्याग म्हणजे एक दिवसाचा उपवास करण्यात येणार आहे. 19 मार्च 18986 रोजी चिलगव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा हा 35 वा स्मृतीदिन आहे.


19 मार्च का?
19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण (ता.महागाव, जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी व चार मुलांसह आत्महत्या केली होती. ही शेतकर्याची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. 2017 पासून महाराष्ट्रातीलच नव्हे, देशातील व विदेशातील लाखो सुहृदयी लोक दरवर्षी 19 मार्चला उपवास करतात.


सहवेदना
अन्न हा जीवाचा मूलाधार आहे. अन्न निर्माण करता आले म्हणून माणूस प्रगती करू शकला. शेतकरी अन्न पिकवतो. तो सर्जक आहे. त्याच्या आत्महत्या ही गंभीर बाब आहे. खरे तर शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती मानली पाहिजे. दुर्दैवाने या गंभीर बाबीकडे कोणाचे फारसे लक्ष नाही.शेतकरी आत्महत्या थांबाव्यात या साठी मी काय करू शकतो? आपण सामान्य माणसे आहोत. आपल्या हातात सत्ता नाही. शेतकरीविरोधी (सीलिंग, आवश्यक वस्तू आदी) नरभक्षी कायदे रद्द करण्याचा अधिकार नाही. आपण शस्त्र घेऊन लढू शकत नाही. करोडो शेतकाऱ्याना आर्थिक मदत देण्याऐवढी पुंजीही आपल्या जवळ नाही. आपण सामान्य माणसे, सहवेदना व्यक्त करू शकतो. शेतकाऱ्याना 'आम्ही तुमच्या पाठीशी आहोत' हा दिलासा देऊ शकतो. तो दिलासा देण्यासाठी व सहवेदना व्यक्त करण्यासाठी 19 मार्च रोजी आपल्याला उपवास करायचा आहे. आत्मक्लेशाचा हा मार्ग या देशात अनेकदा वापरला गेला आहे. त्यातून अपेक्षित परिणाम आले आहेत. तोच प्रयत्न आपण करायचा आहे!


उपवास आणि उपोषण?
हा उपवास उत्स्फूर्तपणे, आपल्या मनाशी निर्धार करून करायचा आहे.
आपण आपले नित्याचे काम करीत उपवास करु शकतो. खूप केले देवा-नवसाची उपवास, आता एक उपवास शेतकऱयांसाठी! याला आपण वैयक्तिक उपवास म्हणू.
सार्वजनिक ठिकाणी बसणे, म्हणजे उपोषण करणे, तुम्हाला जे सोयीचे वाटेल त्या पद्धतीने उपवास किंवा उपोषण करू शकता.


अन्नत्याग का?
१) साहेबराव करपे कुटुंबीय व आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱ्यांचे स्मरण करणे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे.
२) शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करणे.
३) शेतकऱ्यांप्रती आपली बांधीलकी बळकट करणे.
४) शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी कारणीभूत असलेल्या कारणांचा विचार करून विरोध करणे.
५) शेतकरी स्वातंत्र्यासाठी संकल्प करणे.


पदयात्रेचा मार्ग-
औंढा नागनाथ ते चिलगव्हाण अशा सुमारे सव्वाशे कि.मी.च्या पदयात्रेचा मार्ग पुढील प्रमाणे ठरवण्यात आला आहे.
११ मार्च- औंढा नागनाथ- येहळेगाव- डिग्रस- कऱ्हाडे, 12 मार्च- डिग्रस- कऱ्हाडे- हिंगोली- खानापूर चिं., 13 मार्च- खानापूर चिं.- कळमनुरी- माळेगाव, 14 मार्च- माळेगाव- बाभळी- शेंबाळ पिंपरी, 15 मार्च- शेंबाळ पिंपरी- मुळावा- पळशी, 16 मार्च- पळशी-मरसुळ- उमरखेड- सुकळी, 17 मार्च- सुकळी- नांदगव्हाण- बिजोरा, 18 मार्च- बिजोरा- मुडाना- महागाव, 19 मार्च- महागाव ते चिलगव्हाण.


सामूहिक श्रद्धांजली
चिलगव्हाण येथे सकाळ पासुनच वर्दळ राहील. अकरा वाजता सत्यपाल महाराज यांचे शिष्य पंकजपाल महाराज यांचे कीर्तन होईल. त्या नंतर अनेक मान्यवर आपल्या भावना व्यक्त करतील. दुपारी 3 वाजता शोकसभा सुरू होईल. आत्महत्या केलेल्या तमाम शेतकर्याना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रम संपेल.