मुंबई : क्यार वादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस पडून शेतीचे मोठं नुकसान झालेलं आहे. याची पाहणी करण्यासाठी 5 सदस्यीय केंद्रीय पथक उद्या (21 नोव्हेंबर)महाराष्ट्रात दाखल होणार आहे. 22, 23 आणि 24 नोव्हेंबर या 3 दिवसांमध्ये हे पथक राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि नाशिक या विभागांमध्ये हे पथक भेट देणार आहे. डॉ. व्ही. तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखाली पथक महाराष्ट्रात येणार आहे.


अवकाळी पावसाचा फटका राज्यातील 34 जिल्हे आणि 352 तालुक्यांना बसलेला असून 94 लाख हेक्‍टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. तर याचा फटका राज्यातील 1 कोटी 3 लाख शेतकऱ्यांना बसलेला आहे. राज्य सरकारनं 7207.79 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे. कालच एका शासकीय निर्णयाद्वारे 2059 कोटी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वितरित करण्यात आलेले आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्‍टरी 6,800 रूपये, बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी 13,500, फळबागांसाठी प्रति हेक्टरी 18,000 रुपये हेक्टर अशी मदत देण्यात येणार आहे.

या अवकाळी पावसाचा फटका सगळ्यात जास्त औरंगाबाद विभागाला बसलेला असून त्याखालोखाल अमरावती आणि नाशिक या दोन विभागात मोठं नुकसान झाले आहे. या पावसामुळे सर्वाधिक फटका सोयाबीन आणि त्यानंतर कापूस या पिकाला बसलेला आहे. 22 नोव्हेंबरला या पथकांसमोर औरंगाबाद, अमरावती आणि नाशिकमध्ये प्रेझेंटेशन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा दौरा होणार आहे.

हे अधिकारी करणार पाहणी :-
1)औरंगाबाद विभाग - डॉ. व्ही तिरुपुगल आणि डॉ. मनोहरन
2)अमरावती आणि नागपूर विभाग - डॉ. आर.पी. सिंग
3)नाशिक विभाग - दीनानाथ आणि डॉ. सुभाषचंद्रा

सत्तास्थापनेच्या तिढ्यात शेतकरी दुर्लक्षित -
राज्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीमुळे हिरावला गेला आहे. मात्र, राज्यात सरकार अस्तित्वात नसल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मदतीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मागणी केली होती. यावर राज्यपालांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी दोन हेक्‍टरपर्यंतच्या पिकांच्या नुकसानीसाठी 8 हजारांची प्रतिहेक्‍टरी मदत; तर बागायत शेतीसाठी, फळबागांसाठी 18 हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना तत्काळ देण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. मात्र, राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून हेक्टरी 25 हजार मदत जाहीर करावी, अशी भूमिका राजकीय पक्षांनी घेतली होती. त्यामुळं उद्या येणाऱ्या केंद्रीय पथकाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

संबंधित बातम्या -

नागपुरात नुकसानीची पाहणी करताना शरद पवारांचं गडकरी प्रेम...!

पालघर जिल्ह्यात पावसाचे थैमान,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तर मच्छीमार ही संकटात

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Farmer Help | राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा, राज्यपालांकडून मदतीची घोषणा | ABP Majha