Central Railway Jumbo Megablock: मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा स्थानका दरम्यान आज मध्यरात्रीपासून 72 तासांच्या मेगाब्लॉकला सुरुवात होणार आहे. या जम्बो मेगाब्लॉकमुळे 350 लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर, 100 हून लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस, मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बहुप्रतिक्षित पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी हा जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. मध्य रेल्वेवरील पाचवी आणि सहावी मार्गिका खुली झाल्यास लोकलच्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. 


कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक ?


ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान 5 व्या मार्गिकेवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यानच्या अप जलद मार्गिकेवर आणि 6 व्या मार्गिकेवर हा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. 


कोणत्या एक्स्प्रेस गाड्या रद्द?


या जम्बो मेगाब्लॉकमुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय, डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेसह शंभर एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.  


दिवा-वसई मेमु ट्रेन रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या पनवेल स्थानकात थांबवण्यात येणार आहेत. तर सर्व जलद लोकल ह्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.


पाचवी-सहावी मार्गिका खुली होणार


मध्य रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी आतापर्यंत अनेक मोठे जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. मात्र यातील सर्वात मोठा ब्लॉक 4, 5, आणि 6 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकनंतर पाचवी आणि सहावी मार्गिका कार्यन्वित होईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) सांगितले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha