मुंबई : अर्थसंकल्पात मुंबईसाठी आणि मुंबईच्या रेल्वेसाठी किती कोटींची तरतूद करण्यात आली याकडे सर्व मुंबईसह महाराष्ट्राचे देखील लक्ष असते. त्यात मुंबईतील रेल्वे प्रकल्पांना देण्यात आलेल्या निधीचे आकडे एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. या आकड्यांवरून हेच स्पष्ट होत आहे की, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी मुंबईच्या मोठ्या रेल्वे प्रकल्पांसाठी कमी निधी देण्यात आला आहे.


मुंबईतील मोठे रेल्वे प्रकल्प हे मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन पूर्ण करत आहे. याच एमआरव्हीसीला जास्तीत जास्त निधी देण्याची आवश्यकता असते. तरच मुंबईकरांना त्याचा फायदा होतो. मात्र यावर्षी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार एमआरव्हीसीला 575 कोटी देण्यात आले आहेत. मात्र मागील वर्षाचा विचार केल्यास एमआरव्हीसीला 650 कोटी रुपये देण्यात आले होते. म्हणजेच या वर्षी 75 कोटी कमी निधी मुंबईसाठी केंद्राने दिला आहे.


एमआरव्हीसीचे सध्या तीन फेजमध्ये विविध प्रकल्प सुरू आहेत. यापैकी मुंबई अर्बन रेल प्रोजेक्ट म्हणजेच एम युटीपी दोन मधील प्रकल्पांना यावर्षी 185 कोटी मंजूर करण्यात आले. या फेज साठी गेल्यावर्षी 200 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. एमयुटीपी तीन मधील प्रकल्पांसाठी यावर्षी 190 कोटी मंजूर करण्यात आले आहेत. एमयुटीपी तीनसाठी गेल्या वर्षी तीनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. तर एम यु टी पी 3 ए मधील प्रकल्पांसाठी यावर्षी 200 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र गेल्या वर्षी याच फेजसाठी 150 कोटी रुपये देण्यात आले होते.


यावर्षी मुंबई आणि आसपासच्या महानगरपालिकांमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे मुंबई लोकल हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि निवडणुकांसाठी महत्त्वाचा विषय मानला जातो. मात्र केंद्राने मुंबईकरांसाठी निधीमध्ये काटछाट करून मुंबईकरांची उपेक्षाच केली आहे. सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या मुंबई उपनगरीय रेल्वेसाठी भरघोस निधी देण्याची आवश्यकता होती. मात्र केंद्राने उलट निधीत कमतरता केल्याने येणाऱ्या काळात यावरून राजकारण रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.