मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज बुधवारी मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआयच्या न्यायालयानं फेटाळून लावला. साल 2012 मध्ये घडलेल्या शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी तसेच शीनाची आई इंद्राणी मुखर्जीने याआधीही अनेकवेळा जामिनासाठी कोर्टात अर्ज दाखल केले होते. मात्र, प्रत्येक वेळेस प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर आता कोरोनाच्या कारणाखाली इंद्राणीने अंतरिम जामिनासाठी सीबीआय विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
सध्या इंद्राणी भायखळा येथील तुरुंगात असून सगळीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आपल्या आरोग्याला असलेला धोका आहे. ही बाब लक्षात घेत 45 दिवसांचा अंतरिम जामीन देण्यात यावा अशी विनंती इंद्राणीने या याचिकेतून केली होती. तसेच आपल्याला मेंदूशी निगडित आजार असून त्यावर औषधोपचारही सुरू आहेत. न्यायालयात सुरू असलेली खटल्यावरील सुनावणी कोरोनामुळे पुन्हा कधी सुरू होईल ते निश्चितपणे सांगता येणार नाही. तसेच हत्येच्या खटल्यातील आरोपीही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना अंतरिम जामिनासाठी पात्र ठरतो. हा हायकोर्टाच्या स्तरीय समितीचा (एचपीसी) दाखलाही इंद्राणीनं या याचिकेत दिला होता. मात्र सीबीायनं याला विरोध दर्शविला. मुखर्जी या परदेशी नागरिक असून हायकोर्टाच्या उच्च स्तरीय समितीच्या शिफारशीनुसार त्या अंतरिम जामिनास पात्र ठरत नसल्याचा युक्तिवादही त्यांनी केला. तसेच इंद्राणी मुखर्जी या कोणत्याही मोठ्या आजाराने ग्रस्त नाहीत त्यामुळे त्यांना कोरोनाच्या संसर्गाचा तितकासा धोका संभवत नाही, असंही सीबीआयनं स्पष्ट केलं. त्याचबरोबर कारागृहातील सर्व कैद्यांना योग्य उपचार पद्धती आणि आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यांची बाजू ग्राह्य धरत न्यायालयाने इंद्राणी मुखर्जीचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
24 एप्रिल 2012 रोजी शीना बोराची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर इंद्राणीला 2015 मध्ये अटक करण्यात आली. इंद्राणीचा चालक शामवर रायला अवैध हत्यार बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली तेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला. इंद्राणीनं आपला पूर्वाश्रमीचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्यासोबत मिळून आपली मुलगी शीनाची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप यासर्वांवर आहे.