पंढरपूर : बार्शीच्या विशाल फटे घोटाळ्यानंतर आता पंढरपुरातही अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या फसवणुकीबाबत संकल्प पतसंस्थेचा चेअरमन प्रथमेश कट्टे याच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
पंढरपूर येथील प्रथमेश कट्टे हा संकल्प पतसंस्थेचा चेअरमन आहे. आमच्या पतसंस्थेत गुंतवणूक करा, सहा महिन्यात पैसे डबल देतो, असे आमिष दाखवले. त्यामुळे त्याच्याकडे पंढरपूरमधील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी गुंतवणूक केली. परंतु, सहा महिने झाल्यानंतर पैसे देण्यास कट्टे टाळाटाळ करू लागला. त्यामुळे पंढरपूर येथील सुनील भिसे यांनी कट्टे आणि त्याचा साथीदार शुभम खोडके याच्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शहर पोलीस ठाण्यात कट्टे आणि खोडके यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
सुनील भिसे यांनी 9 सप्टेंबर 2019 रोजी संकल्प पथसंस्थेत 15 लाख रूपयांची गुंतवणूक केली. मार्च 2020 मध्ये सहा महिने पूर्ण झाल्यानंतर भिसे यांनी कट्टे याच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी कट्टे हा पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे भिसे यांनी कट्टे आणि खोडके यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली.
पंढरपूर शहरात अनेकांची फसवणूक झाल्याचे या प्रकरणातून पुढे येण्याची शक्यता आहे. परंतु, अनेक जण अद्याप तक्रार देण्यास पुढे आले नाहीत. ज्या लोकांनी या पथसंस्थेत पैशांची गुंतवणूक केली आहे, परंतु, पैसे परत मिळाले नाहीत त्यांनी तक्रार द्यावी असे आवाहन पंढरपूर शहर पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात दोन महिन्यात कोट्यवधी रूपयांची फसवणूक होण्याची ही दुसरी घटना आहे. बार्शी येथील विशाल फटे यानेही अनेकांना दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सध्या तो तुरूंगात असून आता ही दुसरी घटना समोर आल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या