Solapur Barshi Froud Case : सोलापूरच्या बार्शी येथील 'फटे स्कॅम'(Barshi Scam) मधील मुख्य आरोपी विशाल फटे हा कोट्यवधींचा स्कॅम करुन काही दिवस फरार होता. ज्यानंतर तो स्वत: पोलिसांत हजर झाला. दरम्यान बार्शी न्यायालयाने त्याच्या केसची सुनावणी करत 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपण्यासाठी दोन दिवस शिल्लक असताना आता पोलिसांनी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. जी न्यायालयाने मान्य करत फटे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यावेळी पोलिसांनी 8 दिवसांच्या पोलीस कोठडीत मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणार असल्याचे सांगितले.   


आरोपी विशाल फटे याने बार्शी आणि सोलापुरातील अनेक नागरिकांना कोट्यवधींचा चुना लावला होता. त्यानंतर काही दिवस तो फरार देखील होता. फटेने बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार 75 हून अधिकजणांची विशालने 18 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान या सर्वानंतर विशाल फटे हा स्वत:हून पोलिसांत हजर झाला होता. ज्यानंतर बार्शी न्यायलयात त्याला हजर करुन 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी या 8 दिवसांत मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करणे आवश्यक असल्याचे सांगत पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन कोठडीची मागणी केली. ज्यानंतर बार्शी सत्र न्यायालयाकडून विशालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे.


पोलिसांत हजर होण्यापूर्वी आरोपी विशाल फटे याने स्वत: एका व्हिडीओतून पोलिसांत हजर होण्याची कबूली दिली होती.ज्यानंतकर तो पोलिसांत हजर देखील झाला होता. दरम्यान पहिल्या सुनावणी वेळी फटेचे वकिल विशाल बाबर यांनी हा गुन्हा तांत्रिक असल्याने कमी दिवसांची कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला होता. पण याला विरोध करत सरकरी वकिल प्रदीप बोचरे यांनी पोलिसांची बाजू मांडली. ज्यानंतर अखेर न्यायालयाने फटे याला 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. 


'मी भीक मागेन पण लोकांचे पैसे देईन'


विशाल फटे याने पोलिसांत हजर होण्यापूर्वी एक व्हिडीओ शेअर करत संपूर्ण प्रकरणावर त्याचं स्पष्टीकरण देत त्याची बाजू मांडली होती. यात तो म्हणाला, 'मला लोकांचे पैसे बुडवायचे नाहीत. मी जेलमध्ये जरी गेलो तरी जेलमधून बाहेर आल्यावर मी लोकांचे पैसे देईन. मी भीक मागेन पण लोकांचे पैसे देईन. एकाचाही एक नया पैसा देखील माझ्याकडून बुडणार नाही याची खात्री देतो. मी जाणूनबुझून केलेलं नाही.' असंही तो म्हणाला.


पुढे बोलताना फटे म्हणाला, 'मी एका दिवसात 4 लाखाचे 54 लाख केलेला माणूस आहे. ते ही ट्रेडिंगमध्ये, लोकांना स्क्रिनसमोर उभं करुन केलेलं आहे. डॉक्टर, अधिकारी माझे क्लायंट आहेत. त्यांना सगळं माहित असतं. पण मला त्रास द्यायचा म्हणून हे सगळं केलं. मला शोधायची गरज नाही, मी स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर होणार आहे. माझ्यावर जी कायदेशीर कारवाई होईल त्यासाठी मी तयार आहे. या गोष्टीमुळं मी इतका प्रेशर खाली आलोय की मी माझी बायको आणि लेकरासह आत्महत्या करायला चाललो होतो. एवढी इज्जत गेलीय. मला मरणं सोपं वाटत होतं. दीड वर्षाच्या मुलीसह मरायची तयारी होती माझी. या सगळ्या गोष्टीला मी एकटाच जबाबदार आहे. लोकांना माझ्यावर विश्वास असेल त्यांनी वाट पाहा, ज्यांना विश्वास नसेल त्यांनी केसेस करा. मला पळून जायचं नव्हतं आणि जाणार नाही.'


'हवतंर पळालो असातो'


या व्हिडीओत पुढे बोलताना फटे म्हणाला 'मी कुठलाही कमिशन नेमलेला नव्हता. माझ्या चुकीमुळं ही गोष्ट झालीय, मी जे झालंय ते स्वीकारलं आहे. शिक्षा झालीय ती भोगायला मी तयार आहे. माझ्या घरच्यांनी माझ्या ऑफिसला कधीच भेटही दिली नाही. माझा बाप, आई साधी माणसं, मी एकटा सोडलो तर कुणाचाही यात सहभाग नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. मला पळूनच जायचं असतं तर मी आधीच तयारी केली असती. ब्लॅकनं व्हिजा काढला असता आणि दुबईला गेलो असतो. मी पळायचं असतं तरी आरामात पळालो असतो.' 



हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha