Solapur Barshi Froud Case :  महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या बार्शीतील फटे घोटाळ्यात मोठा गौप्यस्फोट झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे याच्या चौकशीतून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. आरोपी विशाल फटे याने शेअर मार्केटमध्ये कोणतीच गुंतवणूक केली नसल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आहे. आरोपी विशाल फटे याची सोलापूरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून 8 दिवस चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत ही माहिती समोर आली आहे.


आरोपी विशाल फटे याने गुंतवणुकदारांना शेअर बाजारातून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी जमवले होते. मात्र, फटे याने शेअर बाजारात गुंतवणूक केलीच नव्हती. विशाल फटे हा एकाकडून पैसे घेऊन तो दुसऱ्यांना द्यायचा. अशाप्रकारे गुंतवणूकदारांनी दिलेली रक्कम वरचेवर फिरवत होता. लोकांना परतावा देण्याचे आश्वासन दिल्याने अनेक जणांना त्याने दुसऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे दिले. मात्र यामुळे लोकांचे देणे वाढू लागले. देणेकऱ्यांची रक्कम वाढत असल्याचे लक्षात आल्याने फटे पसार झाला होता.
 
फटे स्कॅम प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटे हा 17 जानेवारी रोजी स्वतः पोलिसात हजर झाला. त्यानंतर न्यायालयाने त्यास 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. त्याची पोलीस कोठडी संपण्याआधीच काल पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले. 8 दिवस झालेल्या चौकशीतुन मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करण्यासाठी पोलीसानी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती. बार्शी सत्र न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत त्यास 14 दिवसांची न्यायालययीन कोठडी सुनावली. दरम्यान आरोपीची आणखी चौकशी गरज भासल्यास पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.


वेगवेगळी स्किम सांगून प्रलोभन


दरवेळी गुंतवणुकदारांना वेगवेगळी स्किम सांगून विशाल फटे प्रलोभन देत होता. डिसेंबर महिन्यात अशाच पद्धतीची एक ऑफर त्याने गुंतवणुकदारांना दिली. 'एक जानेवारी 2022 पासून एक नवीन स्कीम सुरु होत आहे. ज्यामध्ये केवळ 40 गुंतवणुकदारांना घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही स्कीम केवळ नवीन गुंतवणुकदारांसाठी आहे. या स्कीमनुसार जर 1 जानेवारी 2022 रोजी तुम्ही 10 लाख रुपये जमा केले आणि त्यानंतर 1 वर्ष कोणताही परतावा घेतला नाही तर तुम्हाला 2023 साली ६ हजार टक्के परतावा मिळेल. म्हणजेच 10 लाखांचे वर्षात 6 कोटी रुपये होतील' अशी ऑफर दिल्यानंतर अनेक जणांना धक्काच बसला. 


सावज ठरलेले अनेक गुतंवणूकदार तरुण


बार्शीतल्या या स्कॅममध्ये सावज ठरलेले अनेक गुतंवणूकदार हे तरुण आहे. 25 ते 35 वर्षातील तरुणांचा आकडा हा मोठा आहे. तर ज्यांचा वापर विशालने केला त्या मित्रांची वयं देखील साधरण हीच आहेत. या तरुणांचा केवळ आर्थिक नाही तर मानसिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे.