मुंबई : कॅन्टोन्मेंट बोर्ड नागरी क्षेत्रात विलीन होणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (Cantonment News) मालमत्तेवरील मालकी हक्क, नगरपालिका, स्थानिक संस्थेकडे विनामूल्य हस्तांतरित करता येणार आहे. या,संदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्डांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे.  अहमदनगर, अजमेर, औरंगाबाद, बबिना, बेळगाव, कन्नूर, देवळाली, कामठी, खडकी, मोरार, नसिराबाद, पुणे, सागर आणि सिकंदराबादसह अनेक शहरांमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डांचे नागरी क्षेत्रात विलीनीकरण करण्यासाठी सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. संरक्षण सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर संरक्षण संपदा महासंचालनालयाने (डीजीडीई) कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून नागरी क्षेत्र वगळण्यासाठी ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.


कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मालमत्तेवरील मालकी हक्क, जे नगरपालिका सेवा आणि नागरी सुविधा पुरवण्यासाठी आहेत. त्या राज्य नगरपालिका किंवा स्थानिक संस्थेकडे विनामूल्य हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. राज्य नगरपालिकेचे प्रादेशिक कार्यक्षेत्र लष्करी स्थानक सोडून छावणीच्या संपूर्ण नागरी क्षेत्रापर्यंत विस्तारित करण्याचा प्रस्ताव आहे. जेथे जेथे भारत सरकारचे (GoI) जमिनीवर मालकीचे हक्क आहेत, ते केंद्र शासनाकडे राखले जातील. या अटींच्या अधीन राहून संपूर्ण नागरी क्षेत्र राज्य नगरपालिकेकडे सुपूर्द केले जातील व तिथे स्थानिक नगरपालिका कायदे लागू होतील. राज्य नगरपालिका त्यांच्या अधिकारक्षेत्रातील अशा क्षेत्रांवर स्थानिक कर लादण्यास सक्षम असेल. 


नवीन मार्गदर्शक तत्त्वे कोणती?



  • कॅन्टोन्मेंट भागांचं महापालिका, राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणार

  • कॅन्टोन्मेंटच्या ज्या असेट असतील किंवा ज्या काही लायबलिटीज असतील त्या राज्य सरकारकडे हस्तांतरीत होतील. 

  • करारनाम्यावर असलेल्या प्रॉपर्टीवर देखील महापालिकेचा कंट्रोल असेल.

  • कॅन्टोन्मेंटचा भाग आता त्या शहरातील महापालिका आणि राज्य सरकारच्या अख्त्यारित येईल. तिथे महापालिका आणि राज्य शासनाचे नियम, कायदे लागू होतील. 

  • ज्या भागामध्ये संरक्षण खात्याचं कार्याय असेल किंवा संरक्षण खात्याच्या अखत्यारित येणारा भाग असेल तो मात्र यातून वगळण्यात येईल. 


कोणत्या कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी मार्गदर्शक सूचना जारी? 


अहमदनगर, अजमेर, औरंगाबाद, बबिना, बेळगाव, कन्नूर, देवळाली, कामठी, खडकी, मोरार, नशिराबाद, पुणे, सागर आणि सिकंदराबाद  


हे ही वाचा :


पुण्यातील सरंजामी थाटात वावरणाऱ्या IAS अधिकारी पूजा खेडकरांची कुंडली, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबल खुर्च्या हटवून स्वत:चं फर्निचर बसवलं, ऑडीला लाल दिवा लावला