नागपूर : विधिमंडळाचे नागपुरात होऊ घातलेले हिवाळी अधिवेशन रद्द करा. आधीच कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या नागपूर आणि विदर्भाला आणखी संकटात ढकलू नका अशी मागणी काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे. आपल्या या मागणीसंदर्भात विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
त्या शिवाय विधानसभा अध्यक्ष, उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांपर्यंत ही आपली मागणी पोहोचवल्याचे त्यांनी म्हटलं आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर पासून नागपुरात नियोजित आहे. मात्र, नागपुरात रोज कोरोनाचे हजारो रुग्ण वाढत असताना, रोज 50 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू होत असताना डिसेंबर महिन्यात अधिवेशन घेणे योग्य ठरणार नाही.
सध्या नागपुरातील प्रशासन कोरोनाच्या संकटाशी लढा देत आहे. अशा स्थितीत त्यांना अधिवेशनाच्या कामात जुंपले तर कोरोना संदर्भातल्या कामापासून प्रशासनाचा दुर्लक्ष होऊन नागपुरातील परिस्थिती महाभीषण होईल असा इशारा ही विकास ठाकरे यांनी दिला आहे.
अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने प्रशासनिक अधिकारी आणि कर्मचारी, पोलीस दल नागपुरात येतील. त्यांच्या राहण्याची सोय करणे कठीण होईल. शिवाय त्या सर्वांचा कोरोना पासून बचाव करणे कठीण होईल. त्यामुळे अशा भीषण परिस्थितीत अधिवेशन घेणे संयुक्तिक होणार नाही असेही ठाकरे म्हणाले. अधिवेशन रद्द केल्यावर जो निधी वाचणार आहे तो विदर्भात आणि नागपुरात आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी वापरावा अशी मागणी ही ठाकरे यांनी केली आहे.