मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार पाडायचा प्रयत्न काही पोलीस अधिकारी करत आहेत, असं मी म्हणालोच नाही, असं स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख दिलं आहे. राज्यातील काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली असल्याचं वृत्त लोकमत ऑनलाईनला आलं होतं. या विषयासंदर्भात आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नाही, असे सांगत त्या अधिकाऱ्यांविषयी नाराजीही देशमुख यांनी व्यक्त केल्याचं या वृत्तात म्हटलं होतं.


लोकमतच्या या कार्यक्रमात ते नेमके काय प्रकरण आहे? कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत? कोणत्या अधिकाऱ्यांची नावे तुमच्या समोर आली आहेत आणि तुम्ही हे कसे थांबवले, असा सवाल केला होता. यावर गृहमंत्री देशमुख म्हणाले की, तसे काही मला एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.


याविषयी आज पुण्यात आलेल्या गृहमंत्र्य़ांना विचारलं असता ते म्हणाले की, पोलिसांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता असे मी म्हणालोच नाही. माझ्या तोंडी हे वाक्य टाकले आहे, व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल, असं देशमुखं म्हणाले. चुकीचं वक्तव्य माझ्या तोंडी घालण्यात आलं आहे, असंही देशमुख म्हणाले.


अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती पुणे पोलिस आयुक्तपदी केल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, अमिताभ गुप्ता यांची चूक झाली. त्याचं समर्थन करता येणार नाही. त्यांची चौकशी करून शिक्षाही झाली. मात्र त्यांचं एकूण ट्रॅक रेकॉर्ड चांगलं आहे.


कोरोनामध्ये गेली साडे चार महिने पोलिस उत्कृष्ट काम करत आहेत, ते थकलेत पण हिंमत हरले नाहीत. राज्यात जवळपास 208 पोलिस कोरोनाशी लढताना शहीद झाले आहेत, त्यांना आर्थिक मदत सरकार करत आहे. शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना शहीद पोलिसाच्या रिटायरमेंट पर्यंत घरात राहता येईल असा निर्णय सरकार कडून घेतला गेला आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.


पोलिस भरतीबाबत बोलताना ते म्हणाले की, पोलिस भरती प्रक्रिया ही मोठी आहे. साडे बारा हजार जागांसाठी जवळपास पाच सहा लाख अर्ज येण्याची शक्यता आहे, त्या मुळे त्याला 4 ते 5 महिने लागतील. साडे बारा हजार पोलिस भरतीमध्ये मराठा समाजासाठी 13 टक्के जागा ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी कायदेशीर सल्ला घेणार असून मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही, असंही देशमुख म्हणाले.