मुंबई :  तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे वाढीव दराने नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. तोक्ते चक्रीवादळामुळं बाधित झालेल्यांसाठी 252 कोटींची मदत देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत झाला असल्याचं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

  


तोक्ते चक्रीवादळामुळं सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, पालघर भागाला मोठा फटका बसला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आणि नेत्यांनी कोकणाचा दौरा केला होता. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून मोठे नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. अशातच या चक्रीवादळग्रस्तांसाठी 252 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 


मंत्री उदय सामंत यानिर्णयासंदर्भात बोलताना म्हणाले की, आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणवासीयांना या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी दिलासा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला. जर आपण केंद्र शासनाच्या आदेशाप्रमाणे नुकसानभरपाई दिली असती तर फक्त 72 कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागली असती, पण  मुख्यमंत्र्यांनी तीन पट अधिक मदत देण्याचा निर्णय घेतला. 252 कोटी रूपयांची मदत कोकणवासीयांना महाविकास आघाडीचे सरकार मार्फत देणार आहे. 


ते म्हणाले की, 30 कोटी 73 लाख रूपये रत्नागिरी जिल्ह्याला देणार आहोत. पूर्वीच्या निकषापेक्षा तीन पट मदत सरकारने जाहीर केलेली आहे. 252 कोटी राज्य सरकारने तातडीने दिले. जसं गुजरातला 1000 कोटींची मदत जाहीर केली तशी महाराष्ट्राला 500 कोटींची मदत केली तर मोठा दिलासा मिळेल. विरोधी पक्षाने केंद्राकडे मदतीसाठी पाठपुरावा करावा, असं ते म्हणाले. 


Lockdown In Maharashtra : राज्यात लॉकडाऊन आणखी वाढवण्याचा निर्णय, काही ठिकाणी नियम शिथिल करणार : राजेश टोपे


मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल सांगितलं होतं की, "सात जिल्हांत चक्रीवादळाचा परिणाम झाला. एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार 'तोक्ते' चक्रीवादळात 72 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे. पण महाराष्ट्र सरकारने 250 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील वादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचाही निर्णय झाला आहे. त्यासाठी कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये विजेच्या भूमिगत वायर टाकण्यात येणार आहेत, निवारेही बांधण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन या सर्व कामांची आवश्यकता वर्तवली असून त्यांचे प्रस्ताव मागवले आहेत.


दरम्यान, 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल आणि कुणालाही वंचित ठेवणार नाही असं आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे त्यांनी निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे मदत दिली जाणार असल्याची घोषणा केली होती.