बुलडाणा : महामार्गावर आपली कार आडवी लावून मार्गावर डान्स करणाऱ्या बुलढाण्यातील पोलिसांना काल सायंकाळी आमदार संजय गायकवाड आणि नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला. दरम्यान डान्स करणाऱ्या पोलिसांमुळे मात्र खामगाव-जालना महामार्ग जवळपास 40 मिनिटे  वाहतूक ठप्प झाली होती. सदर पोलीस हे मद्यधुंद होते अशी माहिती समोर आली आहे.  


मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणारे बुलडाणा जिल्ह्यातील बीबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय सुगदेव पवार आणि इतर पोलिसांमुळे ट्राफिक जॅम झालं. तेवढ्यात औरंगाबाद येथून बुलडाण्याकडे जाणारे आमदार संजय गायकवाड हे देखील तिथं पोहोचले, त्यांनी सदर पोलिसाना चांगलेच धारेवर धारल्याचे समोर आलं आहे. 'पोलीस' लिहिलेली पाटी असलेल्या कारमध्ये बसून मद्यपी पोलिसांनी जालना खामगाव महामार्गावर वाहन उभं करून महामार्गाच्या मध्यभागी डान्स सुरू केला.  हा प्रकार जवळपास 40 मिनिटं सुरू होता. दरम्यान या महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. सदर प्रकार देऊळगाव महीनजीक सरंबा फाट्यावर काल सायंकाळी  सहाच्या सुमारास घडला.
 
माहिती नुसार आमदार संजय गायकवाड हे आपल्या वाहनाने बुलढाण्याकडे येत होते. त्यावेळी देऊळगाव महीच्या सरंबा फाट्यानजीक पुढे महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. ठप्प झालेल्या वाहतूक इथून पुढे जाऊन पाहिले असता रस्त्याच्या मधोमध 'पोलीस' लिहिलेली पाटी असलेली एम एच 28 ए.एन 3641 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कार समोर काही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत नाचत होते. 


परिणामी चिखली येथून येणारी वाहतूक दूरपर्यंत ठप्प झाली होती. हा प्रकार पाहून आमदार संजय गायकवाड यांचा राग अनावर झाला. त्यांनी त्या पोलिसाला चांगलेच धारेवर धरले. अचानक घडलेल्या या प्रकाराने भांबावलेल्या त्यामध्ये मद्यधुंद व्यक्तींचा डान्स बंद झाला. त्यानंतर पोलीस लिहिलेल्या त्या पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये बसून त्यांनी पळ काढला. यात बीबी पोलीस स्टेशनचा सहायक पोलिस उपनिरीक्षक विजय पवार व त्याचे दोन साथीदार असल्याची माहिती मिळाली आहे.


यावर बुलढाण्याचे  पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी घडलेला प्रकार हा पोलीस खात्याला अशोभनीय असून रात्रीच API विजय पवार यांचा डिफॉल्ट रिपोर्ट मागविला असून तात्काळ त्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं सांगितलं.