मुंबई : इन्फोसिसच्या माध्यमातून देशविरोधी शक्ती काम करत नाहीत ना? असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुखपत्र असलेल्या 'पांचजन्य' या साप्ताहिकातून विचारण्यात आला आहे. जीएसटी पोर्टलमधल्या तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवत पांचजन्यनं इन्फोसिसवर ही शंका उपस्थित केली आहे. इन्फोसिसवर नक्षली, तुकडे-तुकडे टोळीला मदत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र आमच्याकडे पुरावे नाहीत, असंही पांचजन्यमध्ये सांगितलं आहे. तर पांचजन्य या मुखपत्रातील या लेखामध्ये मांडण्यात आलेले विचार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नाहीत, असं म्हणत RSSनं यू टर्न घेतला आहे. 


जीएसटी आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने इन्फोसिसवर या लेखात टीका करण्यात आली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला मुद्दामहून अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असा आरोप  पांचजन्यच्या लेखात आहे. 'साख और आघात' या मुखपृष्ठ लेखात ही टीका करण्यात आली असून मुखपृष्ठावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे.  


लेखात म्हटलं आहे की,‘इन्फोसिस’ने तयार केलेल्या या दोन पोर्टलमध्ये नेहमी तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे करदाते व गुंतवणूकदार यांची गैरसोय होते. अशा बाबींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा करदात्यांचा विश्वास कमी होतो.सरकारी संस्था महत्त्वाची संकेतस्थळे आणि पोर्टलची कंत्राटे इन्फोसिसला देताना मागेपुढे पाहत नाहीत, कारण ती एक नामवंत सॉफ्टवेअर कंपनी आहे. जीएसटी आणि प्राप्तिकर विवरण पत्रे यांची पोर्टल्स इन्फोसिसने विकसित केली आहेत. करदात्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्यास यामुळे मदतच होत आहे. भारतीय आर्थिक हिताविरोधात इन्फोसिसच्या माध्यमातून कुणी देशविरोधी शक्ती तर काम करीत नाहीत ना अशी शंका लेखात व्यक्त केली आहे. इन्फोसिसने अनेकदा नक्षलवादी, डावे, टुकडे-टुकडे टोळी यांना मदत केली असल्याचे आरोप आहेत, पण त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत. इन्फोसिस ही कंपनी परदेशी ग्राहकांना अशीच वाईट सेवा देते का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.  


आरएसएसचा यू टर्न
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, एक भारतीय कंपनी म्हणून इन्फोसिसचं भारताच्या विकासात महत्वाचं योगदान आहे. या कंपनीकडून ऑपरेट होणाऱ्या इन्कम टॅक्सच्या पोर्टलमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या. त्यावरुन पांचजन्य या आमच्या मुखपत्रातून प्रसिद्ध झालेल्या लेखामध्ये मांडण्यात आलेले विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत, ते पांचजन्यचे विचार नाहीत. त्यामुळे या लेखामध्ये मांडण्यात आलेले विचार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नाही, असं आंबेकर यांनी म्हटलं आहे. 






>