Kokan Refinery Project  : कोकणातील प्रस्तावित रिफायनरीच्या मुद्यावरून आता वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. कोकणात रिफायनरी व्हावी याची मागणी होत असताना दुसरीकडे रिफायनरीला विरोध करणाऱ्या कोकणवासियांनी आज राजापूरमध्ये मोठा मोर्चा काढला आहे. नाणारऐवजी आता रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात होणार असल्याची चर्चा आहे. 


राजापूर येथील स्थानिकांनी निफायनरी प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे. तालुक्यातील बारसू व इतर गावांमध्ये हा प्रकल्प उभारणार असल्याची चर्चा आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील निसर्ग, समुद्र, फळबागांवर परिणाम होऊ शकतो अशी भीतीही स्थानिकांनी व्यक्त केली. कोकणातील जैवविविधताही या प्रकल्पामुळे धोक्यात येणार असल्याचे स्थानिकांनी म्हटले. 


रत्नागिरीतील नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण, पुनर्वसन आणि स्थानिकांच्या मोठ्या विरोधामुळे  बारगळला होता. मात्र आता रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातील बारसूचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं असल्याचे समोर आले आहे. हे पत्र 14 फेब्रुवारीलाच हे पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


राजापूरमध्ये होणार प्रकल्प


राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव आणि पश्चिम भागातील काही गावांची जमीन या प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानुसार, रिफायनरीसाठी जवळपास चौदा हजार एकर जागा आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्यात येणार आहे. 


रिफायनरी प्रकल्पावर आदित्य ठाकरे काय म्हणाले?


राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, "नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव होता. मात्र, विरोधामुळे हा प्रकल्प तेथून स्थलांतरीत केला आहे.चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील स्थानिकांसोबत, भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचे हक्क कसे मिळतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता आहे. त्यांचा विश्वास संपादित करुन पुढं जायचं आहे. विश्वासावर पाय देऊन पुढे जाणार नाही हे आश्वासित करतो. दोन्ही बाजूंच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करुन त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडेन असेही त्यांनी म्हटले.