Buldhana Lok Sabha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील मतदानाची रणधुमाळीची सांगता झालीय. त्यामुळे आता दुसऱ्या टप्पातील निवडणुकांच्या प्रचाराचा आधिक जोर वाढला आहे. विदर्भासह मराठवाड्यातील आठ मतदारसंघात येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षानी आपल्या प्रचाराचा मोर्चा त्या दिशेने वळवला आहे. अशातच राज्यात चरशीची लढत असलेल्या इतर मतदारसंघाप्रमाणेच बुलढाणा लोकसभा (Buldhana Loksabha) मतदारसंघात देखील राजकारण तापले आहे. एकीकडे प्रस्थापित पक्षाचे उमेदवार आपली संपूर्ण ताकद पणाला लावून आपला प्रचार करत असताना अपक्ष उमेदवार आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसतंय. अशातच एका प्रचार सभेत रविकांत तुपकरांनी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्यावर जहरी टीका करत त्यांच्या उल्लेख 'शंकरपाळ्या' असा केलाय. 


नकली भूमिपुत्रांनेच जिल्ह्याचे वाटोळं केलंय - रविकांत तुपकर 


बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे आज मतदारसंघात असे सांगत आहेत की, माझ्याकडे नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून मत द्या. मात्र, आपण लग्नासाठी मुलगी बघायला जातो तर त्या वेळी आपण असं म्हणतो का, की माझ्याकडे नको माझ्या वडिलांकडे पाहून मुलगी द्या. आज बुलढाणा जिल्ह्याचा जे काही वाटोळं केलं ते या नकली भूमिपुत्रांने केलय. अशी घणाघाती टीकाही रविकांत तुपकरांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर केलीय. खासदार जाधव हे लहान मुलांसारखे रडकुंडीचा डाव खेळतात, मात्र त्यांनी एका मर्दा सारखं खेळावं. आता कुणी माझं स्टेटस ही ठेवलं तर प्रतापराव जाधव त्यांना धमक्या देतात. माझ्यावर शेतकरी प्रेम करतात म्हणून प्रतापराव चिडतात. माझी बायको वकील आहे म्हणून माझं बरं आहे. नाही तर माझ्यावर आणखी शेकडो गुन्हे असते, असेही रविकांत तुपकर म्हणाले. 


त्यांना रात्रीची झोपही येत नाही 


बुलढाणा लोकसभा मतदारसंघात येत्या शुक्रवारी मतदान होणार आहे आणि त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षासह अपक्षाचाही प्रचार जोरदार सुरू आहे. त्या अनुषंगाने बुलढाण्यातील चिखली येथे शेतकरी नेते आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांची प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत रविकांत तुपकर यांनी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यावर जहरी भाषेत टीका केली. याना अपक्ष माणूस जिंकून येऊ शकतो, हे आता माहीत पडले आहे. ही लढाई जनतेची आहे. मात्र, प्रतापराव जाधव मुद्दाम मला आणि शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. मी राज्य सरकारला झुकवू शकतो. माझ्या आंदोलनात इतका दम आहे तर केंद्र सरकारलाही झुकवू शकतो. त्यामुळे ते प्रचंड घाबरले असून त्यांना रात्रीची झोपही येत नसल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या