Lok Sabha Election 2024 : बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यामन आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांचातील वाद आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यावरुन दोघांनीही एकमेकांवर जहरी टीका करत इशाराही दिला आहे. दरम्यान, यात महायुतीतील दोन्ही माजी आणि विद्यमान आमदारांनी एकमेकांचा बापही काढला आहे.


यावेळी बोलताना माजी आमदार शिंदे यांनी आमदार गायकवाड यांचा बाप काढलाय, तर निवडणूक झाल्यानंतर कोणाचे किती बाप आहेत हे दाखून देईल, असा थेट इशारा आमदार संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांना दिला आहे. यामुळे मात्र महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून याचा फटका महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


दोन्ही नेत्यांनी थेट एकमेकांचा बाप काढला


बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाचा ए. बी. फॉर्म न मिळाल्याने त्यांचा अर्ज आज बाद करण्यात आलाय. त्यामुळे आपसूकच आमदार संजय गायकवाड हे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत. मात्र, या उमेदवारी अर्जावरुन दोन आजी-माजी आमदारांमध्ये खडाजंगी रंगल्याचे चित्र आहे. बुलढाणा लोकसभेतील भाजपचे बंडखोर उमेदवार विजयराज शिंदे यांनी नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत बावनकुळे यांनी, अर्ज मागे घ्या आणि युतीधर्माचे पालन करा’ असे कडक निर्देश दिले होते.


दरम्यान आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज सोमवारी निर्णय घेणार असल्याचे शिंदे यांनी त्यावेळी बोलताना सांगितले होते. दरम्यान आज आमदार संजय गायकवाड यांना ए. बी. फॉर्म न मिळाल्याने त्यांचा अर्ज आज बाद झाला आहे. परिणामी, भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांनी देखील आज आपली तलवार म्यान केलीय.


नेमकं काय म्हणाले माजी आणि विद्यमान आमदार?


ज्या उमेदवाराला आपला अर्ज ही भरता येत नाही त्याने दुसऱ्याला शिकवायची आणि सल्ला देण्याची गरज नाही. आमदार संजय गायकवाड यांनी आपला अर्ज कायम ठेवला असता, तर त्यांना देखील मी दाखवले असते, अशा शब्दात विजयाराज शिंदे यांनी आमदार संजय गायकवडांवर टीका केली होती. तर या टीकेला उत्तर देतांना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, मला निवडणूक लढवायचीच नसल्याने माझा तो गेम प्लॅन होता आणि तो साध्य झालाय. माझ्या उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रश्न राहिला तर, मी गेली 28 वर्षांपासून निवडणुक लढतो आहे. विधानसभेच्या चार निवडणुका आजवर मी लढलोय. त्यामुळे मला अर्ज कसा भरतात हे शिकवण्याची गरज कुणाला नाही. एकदा निवडणुक होऊन जाऊ दे, मग दाखवतो, असा सज्जड दमही आमदार संजय गायकवाड यांनी दिलाय.


इतर महत्वाच्या बातम्या