बुलडाणा : कोरोना संकटाच्या काळातही संधी शोधणारे अनेकजण आहे. कोरोना काळात विविध पद्धतीने फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यात रेमडेसिवीर इजेक्शनचा काळाबाजार, बनावट लस, उपचारासाठी खर्चाची अधिकची रक्कम उकळणे असे अनेक प्रकार गेल्या काही दिवसात समोर आले आहेत. यात आता खोटी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट दाखवून पैसे वसुलीचा प्रकार समोर आला आहे. खासगी रुग्णालयामध्ये कोरोनाची टेस्ट करून सदर रिपोर्ट पॉझिटिव्ह दाखवून त्या बदल्यात 15 दिवस सुट्टी आणि लाखोंचा विमा लाटण्याचा प्रकार राज्यातील अनेक शहरांमध्ये उघडकीस आले आहे. असाच एक प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात आज उघडकीस आला आहे.
या ठिकाणी एमआयडीसीमधील पारले कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना निगेटिव्ह असताना देखील पॉझिटिव्ह दाखवून त्यांना लाखोंचा विमा आणि इतर सुविधा मिळवून देणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश खुद्द रुग्णालय प्रशासनानेच केला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली असून रुग्णालयातील एका कंत्राटी वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली आहे.
खामगाव शहरात एमआयडीसीमधील पारले कंपनीमध्ये शेकडो कर्मचारी कार्यरत असून या कंपनीमधील कर्मचारी जास्त प्रमाणात कोरोना पॉझेटिव्ह येत असल्याची माहिती खामगाव येथील उपजिल्हा प्रशासनाला समजल्यावरून त्यांना याबाबत शंका आली. त्यांनी याबाबत पळत ठेवली असता पॉझिटिव्ह रुग्ण ज्या वॉर्डात भरती आहेत. त्या वॉर्डात बुधवारी सायंकाळी तपासणी केली असता रुग्णांनी नाकात दुखत असलयाचे सांगितले. याबाबत विचारपूस केली असता एक इसमाने सर्व रुग्णांचे स्वॅब नमुने पुन्हा नेल्याचे समजले.
सुरक्षा रक्षकाडून विचारपूस केली असता विजय राखोंडे नामक कर्मचारी येऊन गेला असल्याचे समजल्यावरून राखोंडेला रुगणांसमोर हजर केले असता रुग्णांनी त्याला ओळखले. दरम्यान पारले कंपनीमधील चंद्रकांत उमप हा आपल्याला प्रत्येक स्वॅबमागे पाच हजार देणार होता, अशी कबुली त्याने दिली. त्यानंतर वैद्यकीय निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांनी शहर पोलिसात तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी कंत्राटी वॉर्ड बॉयला अटक केली असून चंद्रकांत उमप हा आरोपी फरार आहे.