अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची समीक्षा करण्यासाठी अमरावती मतदारसंघात आयोजित बसपाच्या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रभारींना जोरदार मारहाण केली.



लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदार संघात बसपाच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला. या पराभवाची समीक्षा करण्यासाठी बसपातर्फे आज विश्रामगृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीत स्थानिक कार्यकर्त्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला.

बैठकीसाठी आलेले महाराष्ट्र निवडणूक प्रभारी संदीप ताजने आणि राष्ट्रीय महासचिव प्रमोद रैना यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी चांगलीच मारहाण केली. बैठक सुरु होताच कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील परभवाला जवाबदार असल्याचे सांगून उपस्थित नेत्यांवर आरोप सुरु केले.

त्यानंतर सभागृहातील खुर्च्या आणि टेबल फेकण्यात आले. यावेळी संदीप ताजने यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. अखेर ताजने यांनी एका खोलीत स्वतःला बंद करुन आपला बचाव केला. मात्र यावेळी प्रचंड गोंधळ सुरूच होता. काही वेळानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि खोलीत लपलेले बसपा प्रभारी बाहेर पडले.