बुलडाणा : जिल्ह्याच्या लोणार तालुक्यामधील भानापूर शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत विषारी द्रव्य टाकल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे भानापुरातील शेतकरी घाबरले आहेत. विहिरीच्या पाण्यात विषारी द्रव्य मिसळल्याची बाब पाणी वापरण्याआधी लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला.
भाऊबंदकीतील वादांमुळे सख्ख्या चुलत भावानेच विहिरीत विष मिसळल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एकीकडे जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई असताना संपूर्ण पाण्याने भरलेली विहीर नासवण्याचा प्रकार घडला आहे.
सुलतानपूर येथील शेतकरी गजानन मारोती राजगुरु यांची भानापूर शिवारात शेती आहे. ते आपल्या कुंटुबासह शेतातच राहतात. त्यांच्या शेतातील विहिरीत विष टाकल्याने विहिरीतील पूर्ण पाणी लालसर झाले असून त्याचा उग्र वास येत आहे. सुदैवाने हा प्रकार गजानन यांच्या वेळीच लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.
याच विहिरीचे पाणी गजानन राजगुरू यांचे कुटुंबीय पिण्यासाठी वापरतात. याप्रकरणी गजानन राजगुरु यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमुळे गजानन यांचा सख्खा चुलत भाऊ राजकुमार संजाबराव राजगुरु याच्याविरोधात मेहकर पोलीस ठाण्यात कलम ४२० / १८ , २८४ नुसार भा.दं.वि.प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.