मुंबई : सरकारी खात्यात पैसे दिल्याशिवाय काम झालंय अशा घटना फारच कमी वेळा घडल्या असतील. सरकारी विभागांमध्ये भ्रष्टाचार एवढा रुजला आहे की, सहजरित्या नष्ट होणं कठीण आहे. मात्र यात दिलासादायक गोष्ट म्हणजे 2019 या चालू वर्षात लाचखोरीमध्ये काहीशी घट झाली आहे.


2018 मध्ये जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात लाचखोरांसाठी लावलेल्या 301 सापळ्यांमध्ये 410 लाचखोरांना अटक करण्यात आली होती. तर यावर्षी सुरुवातीच्या चार महिन्यात लाचखोरांसाठी लावलेल्या सापळ्यांची संख्या 292 होती तर अटक केलेल्या आरोपींची संख्या 387 आहे.

लाचखोरांच्या बाबतीत यंदाही पुणे विभागाने आपला अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. चार महिन्यांत एकूण 15 प्रकरणांमध्ये 18 लाचखोर आरोपींवर दोष निश्चिती झाली आहे.

तर सरकारच्या इतर कोणत्याही विभागापेक्षा महसूल आणि पोलिस विभागाशी सामान्य नागरिकांचा दैनंदिन आयुष्यात सर्वाधिक संबंध येतो. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यांमध्ये हे दोन्ही विभाग सातत्याने पहिल्या, दुसऱ्या क्रमांकांवर आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये महसूल विभाग लाचखोरीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.