राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील


भुसावळ शहराजवळ खाद्यतेलाचा टँकर उलटला, तेल पळवण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी


रस्त्यावर रोजच अपघाताच्या घटना घडतात, अनेकदा रस्त्यावरुन जाणारे नागरिक वाहन थांबवून पाहतात. मात्र अनेक जण मदतीला धावून जात नाहीत. दुसऱ्या बाजूला एखादा खाद्यपदार्थांचा किंवा इतर दैनंदिन वस्तूंचा टँकर उलटलेला दिसला, तर लोकांची झुंबड उडालेली दिसते. असाच काहीसा प्रकार भुसावळ शहरातील खुशबू हॉटेलसमोर राष्ट्रीय महामार्गावर पाहायला मिळाला आहे. वाचा सविस्तर


मराठवाड्यात पाच महिन्यात 391 शेतकऱ्यांची आत्महत्या, मदत केवळ 10 कुटुंबांना; मार्चपासून निधीच नाही


मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या प्रकरणी मोठी माहिती समोर येत असून, गेल्या पाच महिन्यांत मराठवाड्यातील तब्बल 391 शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे मार्चपासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला देण्यात येणारी एक लाख रुपयांची मदत मिळत नसल्याचे समोर आले आहेत. तर या मदतीसाठी प्रशासनाने आता सरकारकडे निधीची मागणी केली आहे. मार्चपासून निधीच न मिळाल्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना छदामही मिळालेला नसल्याने संताप व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर


शेकडो वर्षांपूर्वीचं झाड पाडताना बेफिकीरपणा, शेकडो पक्षी बेघर; पक्षीप्रेमींकडून कारवाईची मागणी


इंदापूर नगरपरिषदकडून झाडे पडताना योग्य ती खबरदारी न घेण्यात आल्याने देशी विदेशी पक्षांची मोठी वसाहत नष्ट झाल्याचा आरोप पक्षीप्रेमींनी केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा सरदार वीर श्री मालोजीराजे भोसले यांच्या गढीवरील शेकडो वर्षांपूर्वीचे चिंचेचे झाड पाडताना हा प्रकार घडला आहे. या झाडावर गेली शेकडो वर्षे चित्रबलाक या पक्षांची मोठी वसाहत होती ती काही क्षणात नष्ट झाली आहे. घरटी उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने चित्रबलाक पक्षांसह वटवाघुळ, खारुट्या, सरडे देखील जागीच मरण पावले आहेत. वाचा सविस्तर


आठ घटनांचा उल्लेख, जयंत पाटील यांचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे पोलीस आणि गुप्तहेर खातं नक्की काय करतंय असा प्रश्न सामान्यांना पडल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. तसंच या प्रकारांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कठोर कारवाईचे निर्देश दिले जातील, अशी आशा असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर


आज शनी अमावास्या, शनी शिंगणापूरसह नाशिकच्या नस्तनपूरला भाविकांची मांदियाळी, काय आहे महत्व?


आज शनी अमावास्या असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मंदिरात भाविकांची मांदियाळी असून नाशिकच्या नांदगाव येथील नस्तनपूर शनिमंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केल्याचे चित्र आहे. शनी अमावस्येच्या दिवशी दर्शन घेतल्यास आपल्यावर येणारी संकट दूर होतात, अशी धारणा शनीभक्तांमध्ये आहे. त्यामुळे दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने शनी शिंगणापूरसह नस्तनपूरला दर्शनासाठी दाखल होत असतात. वाचा सविस्तर