मुंबई : कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही झोपतो खुशाल अशी यांची अवस्था असून त्यांनी कार्यकर्त्यांना कचरा समजला. त्यामुळेच त्यांना आम्ही हायहोल्टेज शॉक दिला असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. मुंबईच्या रस्त्यांवर हे प्रश्न विचारतात, पण एवढी वर्षे डांबराचं सांबर कुणी खाल्लं हे स्पष्ट करावं असंही शिंदे म्हणाले. फक्त आरशात सांगून वारसा सांगता येत नाही असं म्हणत शिंदेंनी ठाकरे पिता-पुत्रांना टोला लगावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर एकनाथ शिंदे बोलत होते. 


एकनाथ शिंदे म्हणाले की, "सध्या काँक्रीटचे रस्ते करणं सुरु आहे. त्यामुळे लोकांना थोडा त्रास होतोय.  परंतु त्यानंतर पुढील 25 वर्ष मुंबईत खड्डे दिसणार नाहीत. डांबरात हात काळे करण्याची संधी आता तुम्हाला मिळणार नाही. पोपटाचा जीव पिंजऱ्यात असतो यांचा जीव मुंबईतील रस्ते आहेत. मागच्या अनेक वर्षात डांबराचं सांबर कुणी खाल्ले हे आता समोर यायला हवं."


काही मिस्टर बीन यांनी डस्ट बिनचा उल्लेख केला. सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्यामुळे तुमचा डस्टबिन व्हायची वेळ आली आहे. आम्हाला कचरा समजलात त्यामुळे याच कचऱ्याने तुम्हाला हायहोलटेज शाँक दिला असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावला. 


पाच वर्षे टेस्ट मॅच सुरू


एकनाथ शिंदे म्हणाले की, "विरोधकांचा अंतिम आठवडा प्रस्ताव हा उथळ होता. अनेक विषय रिपीट झालेले आहेत. महायुतीची दुसरी इंनिंग आमची सुरु झाली आहेत. नो रिझन, आँन द स्पाँट डिसिजन देणारे आमचं सरकार आहे. रिझन देणाऱ्यांचा सिझन जनतेने संपवून टाकला आहे. पाच वर्षांची टेस्ट मॅच आमची सुरु झाली आहे. पण काम ट्वे्न्टी ट्वे्न्टी सारखं असणार आहे."


एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाराष्ट्राला देशात एक नंबर करण्याचं आमचं काम आहे. राज्यात पायाभूत सुविधांची 10 लाख कोटी रुपयांची कामे सध्या सुरु आहेत. नवी मुंबई एअरपोर्ट, वाढवण बंदर विकासाचं काम सुरु आहे. कनेक्टिव्हिटीवर आम्ही भर दिला आहे. उद्योजक, व्यवसायिक यांना आकर्षित करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. कोस्टल हायवेला गती देण्याचे काम सुरु आहे. पर्यटन विकास साठी प्रयत्न करत आहोत. मे महिन्यात मोठा पर्यटन महोत्सव महाबळेश्वरमध्ये घेणार आहे. आपल्या राज्यातील सर्व हिल स्टेशन विकास इंग्रजांनी केला आहे. मात्र आपण नवीन विकसित केलेलं हिल स्टेशन निर्माण करत आहोत."


आरशात पाहून वारसा सांगता येणार नाही


सपकाळजी यांना देवेंद्र फडणवीस औरंगजेबासारखे वाटले. त्यांना सांगायला हवं सगळीच वेळ सारखी नसते. मशाल पेटवून खुशाल झोपा काढणाऱ्यांना आता शहापण आलं असेल. गद्दार गद्दार म्हणून टीका करत बसलात. आरशात पाहून वारसा सांगता येत नाही हे लक्षात ठेवा असा टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला. 


उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "खोट्या केसेस उभ्या करुन प्रसाद लाड आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न करताना कुठे होतं संविधान? नारायण राणे यांना अटक करताना संविधान आठवलं नाही? राणा दाम्पत्याला त्रास देताना संविधान आठवलं नाही? वाझे काय लादेन आहे का असं म्हणताना संविधान आठवलं नाही? कंगणा राणावत यांच्या घरावर बुलडोझर चालवताना संविधान आठवलं नाही? कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल अशी यांची अवस्था आहे."


विरोधकांनी त्यांची काळजी करावी


विरोधकांवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "पहिल्या सारखं सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संबध राहिला नाही. राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत खूप चिंता व्यक्त करण्यात आली. परंतु वस्तूस्थिती वेगळी आहे. जीडीपीमध्ये आपण नंबर एक आहोत. विरोधकांनी तिजोरीची काळजी करू नये. राज्याची अर्थव्यवस्था चांगली आहे. विरोधकांनी आता त्यांची चिंता करणं गरजेचे आहे. कोण काम करतंय हे जनतेला कळत आहे. त्याचा परिणाम तुम्हाल घरी बसवलं. आमच्यावर टीका करण्यापेक्षा कामाची रेष मोठी करा."


ही बातमी वाचा: