ब्रम्हनाळ (सांगली) : पुराच्या पाण्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सध्या पूर ओसरत असला तरी त्यातून सावरण्याचा अनेक जण आणखी प्रयत्न करत आहेत. अशा वेळी आजचा रक्षाबंधनाचा सण अनेक ठिकाणी साजरा न झाल्याचं समोर आलं आहे. पुरानं उद्ध्वस्त झालेल्या ब्रह्मनाळ गावातही अनेक घरात आज रक्षाबंधनाचा सण साजरा होऊ शकला नाही.

ब्रह्मनाळमध्ये आज गावात विक्रीसाठी एकही राखी स्टॉल नव्हता. पूर ओसरला असला तरी गावातील दुकानं, घरं यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे.  त्यामुळे सण असूनही अनेकांना तो साजरा करता आला नाही. काही जणांनी मिळेल ते बांधून जड अंतकरणाने रक्षाबंधन केले. याच गावातील सळूखे कुटुंबातील भाऊ-बहिणीने रक्षाबंधनाचा सण केला मात्र तो ही अगदी साध्या पद्धतीने. राखी नसल्यानं या कुटुंबातील बहिणीनं आपल्या भावाला नायलॉनचा दोरा बांधून हा सण साजरा केला. यावेळी घरातील काडीपेटी पेटत होती ना पणती. आशा परिस्थितीत हा सण त्यांना साजरा करावा लागला आहे.

सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना महापुराचा फटका बसला आहे. सध्या येथील पूर ओसरला असला तरी जनजीवन आणखी पूर्णपणे सुरळीत झालेले नाही. राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सध्या पूरग्रस्त भागाकडे सुरु आहे.

ब्रह्मनाळमध्ये बोट बुडालेल्या परिसरात 3 पिशव्यात लाखोंचे सोन्याचे दागिने सापडले