जळगाव :  जळगावचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाच्या बाजूला बॉम्ब ठेवला असल्याचा निनावी फोन आल्याने जळगावात एकच खळबळ उडाली.

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या जळगावातील संपर्क कार्यालयात बॉम्ब असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने जळगाव पोलीस नियंत्रण कक्षाला तसेच जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरून दिल्याने एकच खळबळ उडाली. सोमवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

मात्र, माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने महाजन यांच्या संपर्क कार्यालयाच्या परिसराची कसून चौकशी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. चौकशीअंती हा खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास जळगाव पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीचा दूरध्वनी आला. त्याने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात बॉम्ब असल्याची माहिती दिली. त्यानंतर काही मिनिटांनी त्याच व्यक्तीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात देखील फोन करून हीच माहिती दिली.

त्यामुळे एकच खळबळ माजली. जिल्हापेठ पोलिसांनी तातडीने बॉम्ब शोधक व नाशक पथकाला सोबत घेऊन गिरीश महाजन यांचे संपर्क कार्यालय गाठले. तातडीने तेथील लोकांना बाहेर काढून बॉम्ब शोधक व नाशक पथकाने अत्याधुनिक उपकरणांसह तसेच प्रशिक्षित श्वानाच्या मदतीने संपूर्ण परिसराची कसून चौकशी केली. मात्र, चौकशीत कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नाही. या प्रकाराची माहिती देणाऱ्या व्यक्तीने खोडसाळपणा केल्याचे समोर आले.

दरम्यान, या प्रकाराची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलिसांना ज्या क्रमांकावरून फोन आले, त्या क्रमांकाची माहिती काढली जात आहे. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

बॉम्ब असलेला फोन ही अफवाच होती. अफवा पसरवून यंत्रणेस वेठीस धरणाऱ्याविरुद्ध कठोर कार्यवाही व्हावी, असे गिरीष महाजनांचे  जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांनी म्हटले आहे.