न्यूयॉर्क : भारतीय वंशाच्या चार नागरिकांची अमेरिकेत गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चार जणांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. अमेरिकेतील वेस्ट डेस मोइनेसमध्ये शनिवारी ही घटना असून हत्याऱ्यांनी घरात घुसून चौघांची हत्या केली आहे.


मृतांमध्ये चंद्रशेखर सुनकारा (44), लावण्या सुनकारा (41) यांच्यासह 10 आणि 15 वर्षांच्या दोन मुलांना समावेश आहे. चौघांचीही गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


सुनकारा कुटुंबियांच्या घरी काही पाहुणे गेल्याने हा सगळा प्रकार उघडकीस आला. तोपर्यंत घटनेबाबत कुणालाही माहिती नव्हती. घरी आलेल्या पाहुण्यांनी या हत्याकांडाची माहिती पोलिसांना दिली.


घटनेची सखोल चौकशी सुरु केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या चार जणांची हत्या का करण्यात आली? याचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. आरोपीला अटक केल्यानंतर या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळतील, असं पोलिसांनी सांगितलं. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहे.