मुंबई : पाकिस्तानात अडकलेल्या आपल्या कुटुंबियांच्या सुटकेसाठी एका बॉलिवूड दिग्दर्शकानं हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. आपली बायको मुलांसह तिच्या आईवडिलांना भेटण्यासाठी लाहोरमध्ये गेली ती परत येतच नाही. तिथं तिचं ब्रेनवॉश झाल्याचा संशय याचिकाकर्ता पतीनं आपल्या याचिकेतून व्यक्त केला आहे. तसेच आपल्या दोनपैकी एका मुलाचा पासपोर्ट संपला असून दुस-याच्या पासपोर्टचा कालावधीही संपत आलेला आहे. त्यामुळे भारत सरकारनं पाकिस्तानात अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या सुटेकसाठी तातडीनं प्रयत्न करावेत, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत हायकोर्टानं केंद्र सरकारच्या परदेश मंत्रालयाला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी 29 ऑगस्टला घेण्याचं निश्चित केलं आहे.


काय आहे प्रकरण?


मुश्ताक नाडियाडवाला यांनी पाकिस्तानी नागरीक मरियम चौधरी यांच्याशी साल  2012 मध्ये विवाह केला. कालांतरानं मरियम यांनी भारतीय नागरिकत्वासाठी अर्जही केला होता. नोव्हेंबर 2020 मध्ये मरियम आपल्या आजारी पालकांना भेटण्यासाठी दोन्ही मुलांसह पाकिस्तानला गेल्या. पण अचानक तिनं फेब्रुवारी 2021 मध्ये आपल्या मुलांच्या एकल पालकत्वासाठी लाहोर कोर्टात याचिका दाखल केली, आणि कोर्टानं ती मान्यही केली. अचानक आपल्या बायकोचं हे मतपरिवर्तन का झालं?, याची काहीही कल्पना नाही. मात्र ती आता मुलांसह भारतात येण्याच तयार नाही. तिचे आईवडील तिथले वजनदार व्यक्तिमत्व आहेत, त्यांनीच तिच ब्रेनवॉश केलं असावं असा आरोप या याचिकेतून नाडियाडवाला यांनी केला आहे.


मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत पाकिस्तान अडकलेल्या आपल्या कुटुंबियांना तात्काळ भारतात आणण्याची नाडियाडवाला यांनी प्रमुख मागणी केली आहे. आपला 9 वर्षांचा मुलगा आणि 6 वर्षांची मुलगी त्यांच्या आईसोबत पाकिस्तानात अडकले आहेत. मुलांचे पासपोर्स संपलेत त्यामुळे त्यांना आता मायदेशात परत आणणं ही भारत सरकारची जबाबदारी आहे, असा दावा केला आहे. याबाबत वारंवार संबंधित विभागाकडे पत्र व्यवहार करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर कोर्टात दाद मागत असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती एन.आर. बोरकर यांच्या खंडपीठानं या याचिकेवर केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी दोन आठवड्यांकरता तहकूब केली आहे.