धुळे : शिरपूरजवळील वाघाडी गावात रुमीत केमिसिंथ या औषध आणि डायिंगसाठी केमिकल्स बनवणाऱ्या कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरु आहे. एनडीआरएफच्या टीमलाही  पाचरण करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांनी 5 लाखांची मदत जाहीर केला आहे.


कंपनीत स्फोट नेमका कशामुळे झाला याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मृत्युमुखी पडलेले कामगार होते की अन्य कुणी याचाही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. स्फोटाच्या तीव्रतेमुळे आजूबाजूच्या परिसरात हादरे बसले, तसेच काही घरांच्या भीतींनाही तडे गेले आहेत. दूरुनही धुराचे लोट दिसत आहे.



स्फोट झाला त्यावेळी सकाळची वेळ असल्याने कंपनीत कामगाराची संख्या जास्त असू शकते. आत कुणी अडकलंय का याची माहिती मिळू शकलेली नाही. 9 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाच्या अधिक गाड्या मागवण्यात आल्या आहेत.