औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याचे आरोप बिनबुडाचे असून ते राजकीय प्रेरित आहेत. मी कोणत्याही शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतलेलं नाही. मला चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. मी चौकशीला हजर राहणार आहे, अशी प्रतिक्रिया रासप नेते रत्नाकर गुट्टे यांनी दिली.

पाच राष्ट्रीयकृत बँका आणि एका खासगी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करुन रत्नाकर गुट्टेंच्या गंगाखेड शुगर अ‍ॅन्ड एनर्जी लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याने सहा जिल्ह्यातल्या एकूण 15 हजार शेतकऱ्यांच्या नावे तब्बल 328 कोटींचं कर्ज उचलल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी रत्नाकर गुट्टेंवर गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर नॉट रिचेबल असलेल्या रत्नाकर गुट्टेंना गाठून एबीपी माझाने त्यांची बाजू जाणून घेतली.



ज्या शेतकऱ्यांना बँकांच्या नोटिसा आल्यात त्या बँकाच याचं उत्तर देतील. शेतकऱ्यांच्या नावावर मला कर्ज कसं मिळेल? हे सर्व आरोप राजकीय प्रेरित आहेत. जे तुमच्या चॅनलला प्रतिक्रिया देत आहेत (राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मधुसूदन केंद्रे) तेच यामागे आहेत, असा आरोप रत्नाकर गुट्टे यांनी केला.

मधुसूदन केंद्रे यांची आमदारकी रद्द करावी, यासाठी कोर्टात याचिका केलेली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये मला लोकांनी भरभरुन मतदान केलं. त्यामुळे माझा वाढता प्रभाव पाहता मला गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचं रत्नाकर गुट्टेंनी सांगितलं.

दरम्यान याप्रकरणी रत्नाकर गुट्टे यांच्यावर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना आपण चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

काय आहे प्रकरण?

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरात राहणाऱ्या अविनाश चौधरी यांची बारा एकर शेती आहे. आजपर्यंत त्यांनी कधीही बँकेकडे कर्जाची मागणी केली नाही. परंतु आज अविनाश चौधरींच्या नावे परभणीच्या सिंडीकेट बँकेचं तीन लाखाचं कर्ज आहे.

गंगाखेडच्याच संजीवनी चौधरींची दहा एकर शेती आहे. चौधरी या माजी नगरसेविका आहेत. संजीवनी यांनी आपल्या पेट्रोल पंपासाठी कर्ज घेतलं आह, परंतु कधीही शेती कर्ज घेतलं नाही. आज त्यांच्या नावे नागपूरच्या आंध्र बँकेचं 2 लाख 85 हजाराचं कर्ज आहे.

अरुण सानप यांच्या नावावर 10 एकर शेती आहे. सानपांनी गंगाखेडच्या बँक आँफ हैदराबादकडून 99 हजाराचं पीक कर्ज घेतलं होतं. सानपांच्या नावांवर त्यांना ज्ञात नसलेलं परभणीच्या बँक आँफ सिंडेकेटचं 1 लाख 18 हजार कर्ज आहे.

नितीन चौधरींकडे 25 एकर शेती आहे. नितीन चौधरींनी आपल्या शेतीसाठी 90 हजारांचं कर्ज घेतलं होतं. नितीनरावांकडेही त्यांना ज्ञान नसलेलं परभणीच्या बँक आँफ सिंडीकेटचं तीन लाखाचं कर्ज आहे.

गंगाखेड शुगर लिमिटेड माकणीचे प्रमोटर रत्नाकर गुट्टेंनी हा प्रताप केल्याचा संशय आहे. 2014 पासून 2017 पर्यंत सुमारे 15 हजार शेतकऱ्यांच्या नावे खोटी कागदपत्रं तयार करुन पाच राष्ट्रीयकृत बँका आणि एका खाजगी बँकांतून 328 कोटींच कर्ज उचललं गेलं आहे. या सगळ्या प्रकरणाचा तडा लावण्याच्या प्रयत्नात गुट्टेंचे राजकीय विरोधक राष्ट्रवादीचे आमदार मधुसूदन केंद्रे आहेत.

वर्षभरापूर्वी गंगाखेड तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांना कर्जाची गरज पडली. तेव्हा शेतकऱ्यांना सीबील रिपोर्टमध्ये आपल्या नावावर कर्ज असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी चौकशीला सुरुवात केली. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. गंगाखेड पोलिस स्टेशनला तक्रारीचा अर्ज आला. परंतु चौकशी झाली नाही. त्यात मयत लोकांच्या नावे कर्ज घेतल्याचं उघड झालं. त्यानंतर आमदार मधुसूदन केंद्रे बँकांशी पत्रव्यवहार करुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु बँकांनी याला नकार दिला.

फसवल्या गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, अकोला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा, तर फसवलेल्या बँकांमध्ये परभणी सिंडीकेट बँक, युको बँकेच्या गंगाखेड, लातूर आणि नांदेडच्या शाखा, बँक आँफ इंडियाची अंबाजोगाई शाखा, आंध्र बँकेची नागपूर शाखा, युनाटेड बँकेची नागपूर शाखा आणि रत्नाकर बँक मुंबई या बँकांचा समावेश आहे.

एरवी 50 हजारांसाठी शेतकऱ्यांना चकरा मारायला लावणाऱ्या बँकांच्या अधिकाऱ्यांना मलिदा मिळाल्याशिवाय हे झालेलं नाही. खरं तर गंगाखेड शुगर हिमनगाचं टोक आहे. महाराष्ट्रात अनेक कारखान्यांनी हाच प्रताप केला आहे.

न घेतलेल्या कर्जाची माहिती मिळाल्यावर गंगाखेडच्या सात शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने पोलिस महासंचालकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बँकांनाही केवायसी आणि ऑडिट रिपोर्ट घेऊन 25 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे.

कोण आहेत रत्नाकर गुटे?
रत्नाकर गुट्टे परळी तालुक्यातल्या दैठणाघाटचे रहिवाशी. परळीच्या थर्मल प्लँटवर मजूर म्हणून काम करत होते. थर्मल स्टेशनमधली छोटी मोठी कामं घ्यायला सुरुवात केली. तिथून पुढे गुट्टे मोठे कंत्राटदार झाले. सुनिल हायटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीच्या माध्यमातून गुट्टेंनी देशभरात अनेक वीज प्रकल्पांची कामं केली आहेत.

रत्नाकर गुट्टे हे अजित पवारांचे निकटवर्तीय होते. गंगाखेड शुगर या कारखान्याचा शुभारंभही शरद पवार यांनी केला होता. रत्नाकर गुट्टेंच्या पत्नी सुधामती गुटे या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस होत्या.

सध्या रत्नाकर गुट्टे पंकजा मुंडे यांच्या जवळचे मानले जात असले तरी गुट्टे सध्या महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षात आहेत. मागची विधानसभा गुट्टेनी जानकरांच्या पक्षातर्फे लढली आहे.

सामान्य शेतकऱ्याला 50 हजारांचं कर्ज देताना चकरा मारायला लावणाऱ्या बँकांनी गंगाखेड शुगरसाठी मात्रा पायघड्या घातल्या होत्या. कोणत्या बँकेन कोणतंही तारण आणि कसलाही अर्ज नसताना किती कर्ज गंगाखेड शुगरला दिलं ते पहा.

बँकेचं नावं आणि कर्जाची रक्कम
आंध्र बँक – 39.17 कोटी
युको बँक – 47.78 कोटी
युनायटेड बँक आँफ इंडिया – 76.32 कोटी
बँक आँफ इंडिया – 77.59 कोटी
सिंडिकेट बँक – 47.27 कोटी
रत्नाकर बँक – 40.2 कोटी

एकूण 328 कोटी

संबंधित बातमी : शेतकऱ्यांच्या नावे 328 कोटींचं कर्ज घेणाऱ्या रत्नाकर गुट्टेंवर गुन्हा